मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर-मोताळा रोड परिसरात अज्ञात आरोपींनी १४ वर्षीय मुलीच्या तोंडावर स्प्रे मारून तिला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला आणि तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींचा हा डाव फसला. अपहरणकर्ते कारमधून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत त्यांचा पाठलाग केला.
अखेरीस संतप्त नागरिकांनी आरोपींना पकडले. यावेळी जमावाने आरोपींच्या कारची तोडफोड करत त्यांना चांगलाच चोप दिला. त्यानंतर या तीन आरोपींना बोरखेडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच मोठा जमाव पोलीस स्थानकात जमला होता.
advertisement
प्राथमिक माहितीनुसार, पकडलेल्या तीन आरोपींपैकी दोन आरोपी बीड जिल्ह्यातील तर एक आरोपी उत्तर प्रदेशातील असल्याचे सांगण्यात येत आहे. स्प्रेमुळे अत्यवस्थ झालेल्या अल्पवयीन मुलीला तातडीने मलकापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आरोपींनी पीडित मुलीचं कशासाठी अपहरण केलं होतं? याची माहिती अद्याप समोर आली नाही. बोरखेडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पण दिवसाढवळ्या झालेल्या या घटनेमुळे बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.