भडगाव मायंबा गावाचा नवा आदर्श
बुलढाणा जिल्ह्यातील भडगाव मायंबा गावाने शिक्षणाच्या क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केलाय. भडगाव मायंबा ग्रामपंचायतीने एक अभिनव पाऊल उचललं आहे. गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना पाणीपट्टी आणि घरपट्टी करात सवलत देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. गावातील जिल्हा परिषद शाळेत मुलांना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी हा निर्णय घेतल्याचं ग्रामस्थांकडून सांगण्यात आलं आहे.
advertisement
सरपंच अनुसया खडके यांचा मोठा निर्णय
आपल्या जिल्हा परिषदेत ही संख्या कमी असल्याने हा निर्णय घ्यावासा वाटला, असं महिला सरपंच अनुसया खडके यांनी म्हटलं आहे. गावातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल पालकांना देखील दिलासा देईल. विशेषतः, खासगी शाळांच्या वाढत्या स्पर्धेत सरकारी शाळांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा एक पथदर्शी प्रयत्न असल्याचं देखील बोललं जातंय. आपल्या मराठी अर्थातच मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजेत त्यासाठी ग्रामपंचायतीने घेतलेला हा ठराव स्वागतार्ह आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
गुणवत्ता देखील महत्त्वाची
दरम्यान, 'असर' (ASER) अहवालानुसार, राज्यातील सरकारी शाळांमधील शालेय शिक्षणाची गुणवत्ता घसरलेली दिसून येते. तिसरी ते पाचवीच्या ५४ टक्के विद्यार्थ्यांना वजाबाकी करता येत नाही, तर सहावी ते आठवीच्या ३० टक्के मुलांना दुसरीचे पुस्तकही वाचता येत नाही, असे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ही आकडेवारी शैक्षणिक गुणवत्तेतील पोकळी दर्शवते, त्यामुळे आता शाळांबरोबर शिक्षकांच्या गुणवत्तेवर देखील लक्ष देण्याची गरज आहे.
