मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईचे सोने व्यापारी अनिल जैन हे खामगाव येथून सोन्याचे दागिने घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले होते. त्यांनी मेहकर इंटरचेंजवरून समृद्धी महामार्गावर प्रवेश केला. याचवेळी, चालकाने पोटदुखीचे कारण सांगून गाडी महामार्गावर थांबवली. गाडी थांबताच, पाठीमागून आलेल्या एका कारमधून चार ते पाच दरोडेखोर खाली उतरले. त्यांनी अनिल जैन यांना चाकूचा धाक दाखवून मारहाण केली. याच गोंधळात, चालकाने गाडीतील सोन्याची बॅग उचलली आणि तो दरोडेखोरांसोबत फरार झाला.
advertisement
या घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या महामार्गावर लुटमारीच्या घटना वाढत असल्याचे दिसून येते. घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी मेहकर पोलिसांसह समृद्धी महामार्ग पोलिसांची एक टीम रवाना झाली आहे. चालकानेच हा कट रचला असावा, असा पोलिसांना प्राथमिक संशय आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.