खामगावमधील एका वैद्यकीय व्यवसायिकाच्या पुतण्यानं भरधाव कारने दुचाकीस्वाराला उडवलं होतं. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला होता. मात्र उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला. यानंतर शेगाव ग्रामीण पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात मृताच्या रक्ताचेही नमुने बदलल्याचं सांगण्यात येत आहे. पुण्यातील पोर्शे कार अपघातात बड्या बापाच्या पोराला वाचवण्यासाठी पोलीस, डॉक्टर यांनी धडपड केली होती. आता खामगावमध्येही असाच प्रकार समोर आलाय.
advertisement
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या या प्रकरणाची उलट तपासणी केलीय. या प्रकरणात चालकाने त्याच्या नातीच्या लग्नासाठी गुन्हा अंगावर घेतल्याची कबुली पोलिसांकडे दिलीय. तसंच यामध्ये लोकप्रतिनिधींनीही हस्तक्षेप केल्याचा दावा केला जात आहे.
अपघातानंतर ज्या तरुणाने कारने धडक दिली त्यानेच जखमी तरुणाला रुग्णालयात हलवलं. दरम्यान, मृताच्या नातेवाईकांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली असून शेगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या अपघातातील मृताच्या रक्त नमुन्याशीही छेडछाड झाली असल्याचा दावा केला आहे.
