याबाबत मिळालेली माहिती अशी की, घरकुल यादीत नाव असूनही घरकुलाचे बांधकाम गावात होत नाहीय. घर नाही त्यामुळे संग्रामपूर तालुक्यातील ग्राम कोद्री येथील अंकुश नत्थुजी कड या 30 वर्षीय युवकाने एक अजब मागणी शासनाकडे निवेदन देऊन केली आहे.
या तरुणाने पंचायत समिती संग्रामपूरच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केलेल्या या अजब" मागणीची चर्चा सध्या संग्रामपूर तालुक्यात चांगलीच रंगली आहे.
advertisement
घर नसल्याने बायको मिळत नसल्याचे तरुणाचे म्हणणे आहे. त्यामुळे एकतर आपल्याला घरकुल द्यावे नाहीतर बायको द्यावी अशी मागणी तरुणाने निवेदनातून केली आहे. अंकुशच्या या म्हटल्याप्रमाणे त्याचे नाव घरकुलाच्या यादीमध्ये ३५ व्या क्रमांकावर आहे. गेल्या ५ वर्षात घरकुल योजनेतून गावात फक्त ५ घरकुलांचे बांधकामच करण्यात आले आहे. त्यामुळे माझा ३५ वा नंबर येईपर्यंत मी तर पूर्ण म्हातारा झालो असेन. मग मला बायको कशी मिळणार ? असा सवाल अंकुशने पंचायत समिती संग्रामपूरचे नव्याने रुजू झालेले गटविकास अधिकारी पायघन यांना निवेदनातून केला आहे.
घरकुल योजनेची कामे ज्या गतीने होत आहेत, त्या गतीने ३५ वा नंबर यायला अजून ३०-३५ वर्षे लागतील. तोपर्यंत माझी साठी ओलांडली असेल. एकतर घरकुल द्या नाहीतर बायको द्या अशी मागणी अंकुशने निवेदनातून केली आहे. अंकुशच्या या अजब मागणीची चर्चा सध्या सर्वत्र रंगताना दिसत आहे..
