शिवाजी रामराव तेल्हारकर असं अटक केलेल्या आरोपी मुलाचं नाव आहे. तर रामराव तेल्हारकर असं हत्या झालेल्या वडिलांचं नाव आहे. आरोपी विवाहित असून तो आपल्या आई वडिलांसह संग्रामपूर तालुक्यातील बोडखा गावात राहतो. घटनेच्या दिवशी जेवण करत असताना त्याचा आपल्या वडिलांशी वाद झाला. यानंतर त्याने कुऱ्हाडीने वार करत वडिलांची हत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, बोडखा येथील रामराव तेल्हारकर (मृतक) आणि त्यांचा मुलगा शिवाजी रामराव तेल्हारकर यांच्यात नेहमीच वाद होत असे. 'काम करत नाहीस, घराकडे लक्ष देत नाहीस,' अशा कारणांवरून त्यांच्यात वाद होत असे. घटनेच्या दिवशी, ताटात उष्टे अन्न ठेवल्याच्या किरकोळ कारणावरून पुन्हा एकदा त्यांच्यात वाद सुरू झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात शिवाजीने वडिलांवर कुऱ्हाडीने वार करत त्यांची निर्घृण हत्या केली.
advertisement
हत्येनंतर आरोपीने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने वडिलांचा मृतदेह प्लास्टिकच्या पोत्यात भरून पूर्णा नदीच्या पात्रात फेकून दिला. मृतकाची सून आणि आरोपीची पत्नी हिनेच पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर हे क्रूर कृत्य उघडकीस आले. तामगाव पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी शिवाजी तेल्हारकर याला अटक केली आहे. मात्र, घटनेतील मृतदेह अद्याप सापडलेला नाही, त्यामुळे पोलिसांसमोर मृतदेह शोधण्याचे आव्हान आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.