महापालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघे तीन दिवस शिल्लक असताना सोलापुरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपने ऐनवेळी मोठी खेळी करत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या अधिकृत उमेदवारालाच आपल्या गोटात घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक ९ ड मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) उमेदवार तुषार जक्का यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
advertisement
प्रभागात लढत एकतर्फी होण्याची चर्चा
पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत तुषार जक्का यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. या प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक 9 ड मधील निवडणुकीचे गणित पूर्णपणे बदलले आहे या प्रभागात भाजपचे उमेदवार मेघनाथ येमूल, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार तुषार जक्का आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुरेश गायकवाड यांच्यात तिरंगी लढत होणार होती. मात्र राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवारानेच भाजपमध्ये प्रवेश केल्याने ही लढत आता एकतर्फी होण्याची चर्चा सुरू झाली आहे.
तुषार जक्का यांनी पक्षाला सोडचिठ्ठी का दिली?
तुषार जक्का यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे कारण सांगितले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे प्रचाराला कोणी वेळ देत नव्हते. एकही कार्यकर्ता किंवा पदाधिकारी नेता आपल्या प्रचारात सहभागी नव्हता, त्यामुळे कंटाळून पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचा आरोप त्यांनी पक्षावर केला आहे. तर पक्षाने तुषार जक्का यांचे आरोप फेटाळले असून तुषार जक्का यांना पैशाचे आमिष दाखवण्यात आले. त्यामुळेच त्यांनी ऐनवेळी उमेदवारी सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणणे आहे.
राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
तुषार जक्का हे प्रभागात प्रभावी मानले जात असून त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना अधिकृत उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली होती. मात्र मतदानाच्या अगदी तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. या घटनेमुळे राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण असून अनेक कार्यकर्त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
भाजपसाठी खेळी फायद्याची ठरणार?
भाजपसाठी मात्र ही खेळी अत्यंत फायद्याची ठरण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षांचा मजबूत उमेदवार आपल्या गोटात आणून भाजपने प्रभाग क्रमांक 9 ड मधील विजयाचा मार्ग सुकर केल्याची चर्चा रंगली आहे. तुषार जक्का यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने येथील निवडणूक प्रक्रिया कशी पार पडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे
