सिमेंटने भरलेला ट्रक दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात चालक राजू राजपूत आणि त्यांचा तरुण मुलगा राहुल राजपूत (२०) या बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाला. विजापूर जिल्ह्यातील कोचलगी तांडा इथे हे कुटुंब आपल्या ट्रकमधून सिमेंटची वाहतूक करत होतं, करुळ घाटात एका वळणावर ट्रकने मागून धडक दिली आणि 300 फूट खोल दरीत सिमेंटचा ट्रक गेला. दोघांचाही जागीच मृत्यू झाला आणि ट्रकचंही मोठं नुकसान झालं.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, राजू राजपूत हे आपल्या मुलासह गुलबर्गा येथून सिमेंट भरून वैभववाडीच्या दिशेने येत होते. पहाटे ४:४५ च्या सुमारास त्यांनी गगनबावडा येथे ट्रक थांबवला. बाप-लेकाने तिथे एकत्र चहा घेतला, थोड्या गप्पा झाल्या आणि ५ च्या सुमारास ते घाटाच्या दिशेने निघाले. कोणालाही कल्पना नव्हती की हा त्यांचा एकत्र घेतलेला शेवटचा चहा ठरेल.
करूळ घाट उतरत असताना दिंडवणे गावाजवळ राजू यांचा ट्रकवरील ताबा सुटला. भरधाव ट्रक लोखंडी बॅरिकेडस् तोडून थेट ३०० फूट खोल दरीत कोसळला. ट्रकचा वेग इतका होता की खाली कोसळताच गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला. पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या ट्रक चालकाने हा थरार पाहिला आणि तातडीने पोलिसांना माहिती दिली.
अपघाताची माहिती मिळताच वैभववाडी पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर आणि सह्याद्री जीवरक्षक टीमने घटनास्थळी धाव घेतली. दरी अत्यंत खोल आणि अवघड असल्याने मृतदेह बाहेर काढताना पथकाची मोठी ओढताण झाली. मात्र, ग्रामस्थ आणि जीवरक्षकांनी जीव धोक्यात घालून दरीत उतरून दोन्ही मृतदेह बाहेर काढले. राजू राजपूत यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि दोन मुली असा मोठा परिवार उघड्यावर पडला आहे.
गेल्या १५ दिवसांत करूळ घाटात झालेला हा चौथा अपघात आहे. घाटातील रस्ता सिमेंट काँक्रीटचा झाल्यापासून वाहनांचा वेग प्रचंड वाढला आहे. "रस्ता चांगला झाला म्हणून लोक सुसाट गाड्या चालवतात, पण वळणावर ताबा सुटला की थेट मृत्यूशी गाठ पडते," अशी खंत स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. येथे वेगमर्यादा निश्चित करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
