खंडोबांनी मल्ल दैत्याचा वध केला आणि मणी दैत्याला क्षमा करून त्याला आपल्यासोबत राहण्याचे वरदान दिले. या विजयाच्या आनंदातच ऋषिमुनींनी "सदानंदाचा येळकोट" असा जयजयकार केला. याच विजयाचे आणि आनंदोत्सवाचे प्रतीक म्हणून घरोघरी 'तळी भरली' जाते आणि 'तळी उचलली' जाते.
तळी कशी भरली जाते?
घरातील देवासमोर जमिनीवर आसन मांडून तळी भरण्यासाठी 5 पुरूष बसतात. मग ते लहान मुलं, तरूण किंवा माणसं सुद्धा चालतात. एका ताम्हणात किंवा मोठ्या तबकात भंडारा (हळद) पसरवला जातो. यावर पाण्याचा कलश ठेवला जातो, ज्यात विड्याची पाने, सुपारी आणि खोबऱ्याची वाटी असते. हा कलश खंडोबाचे प्रतीक मानले जाते. यानंतर विड्याची पाने, खोबरे आणि भंडारा देवाला अर्पण केला जातो. आरती आणि पूजा झाल्यावर, कुटुंबातील सदस्य डोक्यावर टोपी ठेवून त्यावर हे ताम्हण (तळी) ठेवतात.
advertisement
त्यानंतर "सदानंदाचा येळकोट! येळकोट! येळकोट! जय मल्हार!" या जयघोषात तळी तीन वेळा वर-खाली करून उचलली जाते. हा जयघोष म्हणजे खंडोबाच्या विजयाचा आणि त्यांच्या कृपेचा आनंदोत्सव असतो. विधी संपल्यावर तळीतील भंडारा सर्व भक्तांच्या कपाळी लावला जातो. चंपाषष्ठीच्या दिवशी नैवेद्याला विशेष महत्त्व असते. या दिवशी कुलधर्म- कुलाचाराप्रमाणे वांग्याचे भरीत आणि बाजरीच्या भाकरीचा रोडगा यांचा नैवेद्य खंडोबाला दाखवला जातो. चातुर्मासात निषिद्ध मानलेले वांगे आणि कांदा या दिवशी खंडोबाला अर्पण करण्याची प्रथा आहे.
चंपाषष्ठीचे व्रत केल्याने किंवा तळी भरल्याने भक्तांना सुख, समृद्धी आणि आरोग्य लाभते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. तसेच, आयुष्यातील संकटांवर विजय मिळवण्यासाठी खंडोबाची कृपा आणि आशीर्वाद मिळतो, अशी भावना आहे. तर, चंपाषष्ठीला 'तळी उचलणे' ही परंपरा केवळ धार्मिक विधी नसून, ती महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेचा आणि खंडोबाच्या पराक्रमाचा गौरवशाली इतिहास आहे. या परंपरेतून येणारी श्रद्धा आणि उत्साह प्रत्येक मराठी कुटुंबाला जोडतो.