डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी लोकसभा निवडणूक काळात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. शिवसेनेकडून सांगली मतदारसंघातून ते लोकसभा निवडणूकही लढले. परंतु अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी त्यांना पराभवाची धूळ चारली. तेव्हापासून चंद्रहार पाटील पक्षात एकटे पडल्याची चर्चा होती.
चंद्रहार पाटील सोमवारी शिंदे गटात पक्षप्रवेश करणार
advertisement
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रत्नागिरी दौऱ्यात चंद्रहार पाटील यांनी काही दिवसांपूर्वी त्यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत चंद्रहार पाटील यांनी भोजन केले. त्यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये गुप्त चर्चा झाली. तेव्हापासून चंद्रहार पाटील यांच्या शिंदे गटातल्या प्रवेशाने जोर धरला होता. अखेर सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी चंद्रहार पाटील हे सोमवारी प्रवेश करत असल्याचे जाहीर केले आहे.
दम असेल तर पक्षप्रवेश रोखा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रहार पाटील हे येत्या सोमवारी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. ठाकरे गटातील नेत्यांना मी कित्येक वेळा सांगतोय, इकडे तिकडे लक्ष देण्यापेक्षा पक्षाच्या माणसांवर लक्ष द्या. त्यांना सांभाळून ठेवा, असा सल्ला देत दम असेल तर चंद्रहार पाटील यांचा पक्षप्रवेश रोखून धरा, असे संजय शिरसाट म्हणाले.
मला ऑफर आहे पण... चंद्रहार पाटील यांचे स्पष्टीकरण
दुसरीकडे शिंदे गटात पक्षप्रवेश करण्याचा माझा निर्णय अद्याप झालेला नाही, असे सांगत मला त्यांच्याकडून ऑफर देण्यात आलेली आहे, असे चंद्रहार पाटील यांनी स्पष्ट केले. माझ्या पक्षप्रवेशाच्या बाबतीत, मी अधिकृत भूमिका घेतलेली नाही. शिवसेना शिंदे गटाकडून पक्ष प्रवेशाबाबत मला ऑफर आहे. पक्षप्रवेश करायचा, पक्ष सोडायचा याबाबतचा अजून निर्णय घेतला नाही. सध्या मी बाहेर गावी असून माझ्या कार्यकर्त्यांसोबत बोलून पुढील निर्णय घेईन, असे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी एक्सवर पोस्ट करून माहिती दिली.