छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रसिद्ध सिद्धार्थ उद्यानात मराठवाडा मुक्ती संग्रामाविषयी संग्रहालय उभारलेलं आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली या संग्रहालयाची उभारणी करण्यात आलेली आहे. याठिकाणी चित्रांच्या व फोटोंच्या माध्यमातून मराठवाड्याचा आणि मुक्तीसंग्रामाचा इतिहास दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामातील सर्व घटनाक्रम या ठिकाणी बघता येतो.
advertisement
मराठवाडा मुक्ती संग्रामात अनेक स्वातंत्र्य सैनिक सहभागी झाले होते. काहींनी आपल्या प्राणांची आहुती देखील दिली होती. त्यांची माहिती या ठिकाणी बघायला मिळते. संग्रहालयामध्ये 1818 पासूनचा इतिहास दाखवण्यात आलेला आहे. संग्रहालयामध्ये 35 पॅनल उभे करण्यात आलेले आहेत. त्यावर मराठवाड्याचा इतिहास दाखवण्यात आलेला आहे.
संग्रहालयाचे समन्वयक सारंग टाकळकर म्हणाले, "पुढच्या पिढीला आपला इतिहास माहिती व्हावा, यासाठी आम्ही या संग्रहालयाची उभारणी केलेली आहे. हे ठिकाण मराठवाड्यातील प्रत्येक व्यक्तीने बघावं आणि आपला इतिहास कसा होता, हे जाणून घ्यावे. कारण, मराठवाड्याचा इतिहास अतिशय रक्तरंजित आहे. मराठवाड्यातील लोकांनी खूप मोठा संघर्ष केलेला आहे. मी सर्वांना विनंती करतो की, हे संग्रहालय पाहून आपला इतिहास जाणून घ्यावा."