गेट का उघडलं नाही? हायफाय सोसायटीत सुरक्षारक्षकाला मामा-भाच्याकडून बेदम मारहाण; व्हिडीओ व्हायरल
- Reported by:Pritam Pandit
- Published by:Prachi Amale
Last Updated:
मध्यरात्रीची वेळ असल्याने सुरक्षारक्षक मोरे यांना गेट उघडण्यास काही सेकंदांचा उशीर झाला आणि याच गोष्टीचा राग मनात धरून मामा-भाच्याने मोरे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.
सोलापूर : शहरातील विजापूर नाका परिसरातील एका उच्चभ्रू (हायफाय) सोसायटीमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. केवळ गेट उघडण्यास उशीर झाला या कारणावरून एका रहिवाशाने आपल्या भाच्याच्या मदतीने ड्युटीवर असलेल्या वृद्ध सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण केली. आरोपीने सुरक्षारक्षकाच्या छातीवर बसून त्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका नामांकित अपार्टमेंटमध्ये शशिकांत मोरे हे सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहेत. मध्यरात्री दोनच्या सुमारास आरोपी प्रसाद व्हनपरके हा आपल्या भाच्यासह कारने सोसायटीत आला. मध्यरात्रीची वेळ असल्याने सुरक्षारक्षक मोरे यांना गेट उघडण्यास काही सेकंदांचा उशीर झाला. याच गोष्टीचा राग मनात धरून मामा-भाच्याने मोरे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.
advertisement
छातीवर बसून केली मारहाण
हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपींनी शशिकांत मोरे यांच्या हातातील काठी हिसकावून घेतली आणि त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण करताना मोरे यांना खाली पाडून थेट त्यांच्या छातीवर बसून बुक्क्यांनी मारहाण केली. या हल्ल्यामुळे मोरे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही सर्व घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यातील दृश्ये अंगावर काटा आणणारी आहेत.
advertisement
मामा- भाच्याविरोधात गुन्हा दाखल
या प्रकरणी पीडित सुरक्षारक्षक शशिकांत मोरे यांच्या फिर्यादीवरून विजापूर नाका पोलिसांनी तात्काळ दखल घेतली आहे. मुख्य आरोपी प्रसाद व्हनपरके आणि त्याच्या भाच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 118 (1), 115(2), 352 आणि 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या नागरिकांकडून अशा प्रकारची वर्तणूक होत असल्याने सोलापूरकरांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Mar 11, 2026 3:23 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
गेट का उघडलं नाही? हायफाय सोसायटीत सुरक्षारक्षकाला मामा-भाच्याकडून बेदम मारहाण; व्हिडीओ व्हायरल










