नाना पाटेकरांचा अभिनयाला ब्रेक? घेतला मोठा निर्णय; म्हणाले, 'मला माझ्या पद्धतीने...'
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Nana Patekar Retirement : नाम फाऊंडेशनच्या दशकपूर्ती सोहळ्यात बोलताना नानांनी त्यांच्या आयुष्यातील मोठी घोषणा केली. त्यांनी हा निर्णय का घेतला याचं कारणही सांगितलं.
मुंबई : अभिनेते नाना पाटेकर यांचा हाऊसफुल 5 हा सिनेमा काही महिन्यांआधी रिलीज झाला. गेली अनेक दशकं नानांनी मराठीच नाही तर हिंदी आणि साऊथमध्येही काम केलं. नानांच्या अभिनयाची छाप वर्षानुवर्ष प्रेक्षकांच्या मनावर कोरली आहे. नाना पाटेकर अनेक सामाजिक कार्यांमध्ये सक्रीय असतात. त्यातीलच एक म्हणजे नाम फाऊंडेशन. नाम फाऊंडेशनच्या दशकपूर्ती सोहळ्यात बोलताना नानांनी त्यांच्या आयुष्यातील मोठी घोषणा केली. नानांना अभिनयातून निवृत्ती घ्यायची आहे अशी इच्छा त्यांनी व्यत्त केली आहे.
रविवारी गणेश कला क्रीडा मंच येथे नाम फाउंडेशनचा दशकपूर्ती सोहळा पार पडला. या कार्यक्रमात नानांनी उपस्थितांशी अनौपचारिक संवाद साधला. यावेळी बोलताना नानांनी निवृत्ती घेण्याची इच्छा दाखवली. नाना म्हणाले, "आजवर मी खूप काम केलं आता मला मनासारखं जगावं असं वाटतंय.1 जानेवारीला मी वयाची पंचाहत्तरी पूर्ण करीन. त्यानंतर नाटक, सिनेमातून निवृत्त होऊन गावखेड्यांतील विवंचना समजून घ्याव्यात आणि त्यांच्यासाठी काही करावं, असं वाटतंय."
advertisement
नाना पुढे म्हणाले, "पंचाहत्तरीनंतर नाटक, सिनेमातून निवृत्त व्हावं असे वाटतंय. ज्यातून तुम्हाला खूप काही सांगता येईल अशी एखादी छान कलाकृती वाट्याला आली तर ती मी नक्कीच करेन पण आता मला माझ्या पद्धतीने जगू द्या".
नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी मिळून 'नाम फाउंडेशन'ची स्थापना केली. या नाम फाउंडेशनला 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं बोलताना नाना म्हणाले, "ही धुराही आता मकरंदनेच पुढे न्यावी. कान धरायला आणि पाठीवर थाप द्यायला मी सोबत असेनच. नामची पुढची पिढी उत्तम पद्धतीने आमचे काम पुढे नेत आहे. कामाची व्याप्ती खूप वाढली आहे. आता नामचं पुढील काम मकरंद ठरवेल. मी असेन तरच काम करीन ही त्याची भूमिका चुकीची आहे. नामसारख्या शंभर संस्था निर्माण झाल्या, तरी समस्या सुटणार नाही."
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 15, 2025 12:20 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
नाना पाटेकरांचा अभिनयाला ब्रेक? घेतला मोठा निर्णय; म्हणाले, 'मला माझ्या पद्धतीने...'