सुरुवातीला, गावातील काही लोकांनी त्यांना खडक्या नाल्याजवळ दुचाकीसह पडलेले पाहिले. हा अपघात असावा, असे सगळ्यांना वाटले. नितेशचा भाऊ सतीश यांनी त्यांना घाईघाईत ग्रामीण रुग्णालयात नेले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. एका साध्या अपघातापेक्षा इथे काहीतरी भयानक घडले असावे, अशी शंका काही लोकांना होती आणि त्यांची ती शंका खरी ठरली.
advertisement
रात्री ही वार्ता गावात पसरली. कोरपना पोलिस ठाण्याच्या निरीक्षक लता वाडीये आणि त्यांच्या टीमने घटनास्थळाची सखोल पाहणी सुरू केली. पोलिसांना नाल्याच्या अगदी जवळच्या मार्गावर आणि मृताच्या मोबाईलजवळ रक्ताचे काही डाग आढळले. नुसता अपघात असता तर रक्ताचे इतके डाग आढळले नसते. या संशयामुळे पोलिसांनी सखोल पुरावे गोळा केले. डॉक्टरांनी दिलेल्या शवविच्छेदन अहवालातून जो खुलासा झाला, त्याने सगळ्यांनाच हादरवून सोडले. नितेश यांचा गळा आवळल्याने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
चंद्रपुरातील प्रकरण एक लव ट्रँगल असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले. नितेश यांची पत्नी साधना हिचे गावातीलच बादल सोनी याच्याशी प्रेमसंबंध (Affair) होते. गणपती उत्सवादरम्यान नितेश आणि बादल यांच्यात वाद झाला होता आणि बादलने नितेशला जीवे मारण्याची धमकीही दिली होती. विशेष म्हणजे, साधना स्वतः गडचांदूर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली होती, पण बादलने माफी मागितल्याने तेव्हा ही तक्रार मागे घेण्यात आली होती.
घडलेल्या रात्री, बादल आणि त्याचा मित्र तुषार येनगंटीवार हे नितेशची वाट पाहत होते. नितेश दुचाकीवरून येताच, बादलने क्षणाचा विलंब न करता त्यांच्या डोक्यावर हातोडीने जोरदार वार केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या अवस्थेत नितेशने बादलला सांगितले की, तो साधनाला सोडचिठ्ठी (Divorce) देईल. पण, नितेश पोलिसात तक्रार करेल या भीतीने बादलने त्याचा गळा आवळला आणि त्याचा थंडपणे जीव घेतला. यानंतर आरोपींनी हा गुन्हा अपघात वाटावा म्हणून नितेशचा मृतदेह नाल्याजवळ नेऊन टाकला आणि एका बनावाची निर्मिती केली.
या थरारनाट्यात बादल सोनी, त्याचा मित्र तुषार येनगंटीवार यांना अटक करण्यात आली आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे, पोलिसांनी नितेशची पत्नी साधना वाटेकर हिलाही ताब्यात घेतले आहे. साधनाचाही या कटात सहभाग असल्याचे उघड झाले आहे. या प्रेमसंबंधांमुळे पती नितेशचा बळी गेला, आणि त्यांच्या 9 वर्षांच्या मुलीला पोरके व्हावे लागले. तर या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक लता वाडीये यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास वेगाने सुरू आहे.
