मुलीच्या वडिलांनी प्रेमविवाहाला नकार तर दिलाच पण मुलाविरोधात तक्रारही दिली. तरुण आपल्या मुलीला त्रास देत असल्याची तक्रार त्यांनी पोलिसात दिली. यामुळे मुलाच्या वडिलांनी सहा महिन्यांपूर्वीच्या वाघाच्या शिकारीचं प्रकरण उकरून काढत मुलीच्या वडिलांना अडचणीत आणलं. आता वनविभागाने मुलीच्या वडिलांसह दोघांना अटक केली आहे.
या प्रकरणी माहिती अशी की आरोपी सुरेश चिचघरे यांनी गावाजवळील शेतात मक्याचे पीक लावले होते आणि त्याच्या संरक्षणासाठी ताराच्या कुंपणात करंट सोडला होता. मात्र या करंटचा धक्का लागून सहा महिन्यांपूर्वी एका वाघाचा मृत्यू झाला. आरोपीने हे प्रकरण दाबण्यासाठी वाघाचा मृतदेह खड्डा खणून पुरला. मात्र मुलाच्या वडिलांनी हे बिंग फोडल्याने वनविभागाने आरोपी सुरेश चिचघरे आणि त्याचा साथीदार श्रीकांत बुरांडे याला अटक केली आहे. सध्या वनविभाग या प्रकरणाचा तपास करत असून प्रेमविवाहाला दिलेला नकार थेट वाघाच्या शिकारी पर्यंत जाऊन पोचलाय.
advertisement
युवा शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या खानगाव येथे वाघाच्या हल्ल्यात युवा शेतकऱ्याचा मृत्यू झालाय. 34 वर्षीय श्रावण खोब्रागडे स्वतःच्या शेतात पीक आणि जनावर देखभालीसाठी गेला होता. रात्री उशिरा तो शौचास नाल्यानजीक गेला असता वाघाने त्याच्यावर झडप घातली. सकाळी श्रावण घरी न परतल्याने ग्रामस्थांनी शोध सुरू केला. या भागात वाघाच्या दहशतीने नागरिक संतप्त झाले आहेत. वारसाला नोकरी, जंगलाला कुंपण आणि बफर भागातील नीमढेला सफारी प्रवेशद्वार कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी त्यांनी केली आहे. वन आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोचले असून परिस्थितीवर मार्ग काढला जात आहे.