चंद्रपूर : खासगी ट्यूशन क्लासमध्ये नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थीनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या धटनेने खळबळ उडाली आहे. प्रांजली हनुमंत राजुरकर असं तिचं नाव असून १७ वर्षीय विद्यार्थीनी वसतिगृहात राहत होती. अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या करत असल्याचं तिनं सुसाइड नोटमध्ये लिहिलं आहे. तिने एक व्हिडीओसुद्धा फोनमध्ये शूट केला होता. आता या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
advertisement
याबाबत मिळालेली माहिती असी की, प्रांजली राजुरकर ही १७ वर्षांची विद्यार्थीनी चंद्रपूर इथल्या जिल्हा क्रीडा संकुल परिसरातल्या इन्स्पायर या खासगी क्लासमध्ये नीटची तयारी करत होती. तिने वसतीगृहातील खोलीत एकटी असताना गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येआधी तिने फोनमध्ये एक व्हिडीओसुद्धा शूट करून ठेवला आहे. प्रांजली मूळची यवतमाळ जिल्ह्यातल्या मोरगाव इथली आहे. प्रांजलीने आत्महत्येआधी लिहिलेल्या चिट्ठीत आई-बाबांची माफी मागितलीय. त्यात लिहिलंय की सॉरी आई-बाबा, मला अभ्यासाचं टेन्शन आहे. त्यामुळेच मी जगाचा निरोप घेतेय.
इन्स्पायर ट्युशन क्लासेसमध्ये शिकणारी प्रांजल विद्यार्थीनींच्या वसतीगृहात राहत होती. ती मंगळवारी मामाच्या घरी गेली. तिथून सायंकाळी वसतीगृहात परतली. तेव्हा तिने मैत्रिणींना मी उद्या क्लासला येणार नाही, खूप थकली आहे असं सांगितलं. दुसऱ्या दिवशी ती क्लासला गेली नाही. पण जेव्हा बुधवारी सायंकाळी मैत्रिणी परतल्या तेव्हा प्रांजली खोलीतून बाहेर आली नाही. त्यामुळे मैत्रिणींना संशय आला. त्यांनी वसतीगृहाच्या कर्मचाऱ्यांना याबाबत कल्पना दिली.
वसतीगृहाच्या कर्मचाऱ्यांनी प्रांजलीच्या खोलीचा दरवाजा ठोठावला. तिने कोणताच प्रतिसाद न दिल्यानं शेवटी तो तोडण्यात आला. तेव्हा प्रांजलीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून अधिक तपास केला जात आहे.