चंद्रपूर जिल्ह्यातून एक अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत ट्रकने एका मोटरसायकलला धडक दिली. या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. तर 2 जण जखमी झाले आहेत. राजुरा शहराजवळील धोपटाळा येथे ही घटना घडली.
advertisement
या अपघातात निलेश वैद्य (32 वर्ष) त्यांची पत्नी रुपाली वैद्य (26 वर्ष) आणि मुलगी मधू वैद्य (3 वर्ष) यांचा मृत्यू झाला आहे. धोपटाळा येथील गुरुदेव नगर येथे राहणारे निलेश वैद्य हे बल्लारपूर येथून आपल्या घरी परत जात असताना हा अपघात झाला. अपघातानंतर घटनास्थळी मोठा तणाव निर्माण झाला असून राजुरा पोलीस अपघातस्थळी दाखल झाले आहेत. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. इथून कोळसा वाहतूक होत असल्याने या ठिकाणी अनेक अपघात झाले आहेत. मात्र प्रशासनाने या रस्त्याच्या दुरुस्तीकडे सपशेल दुर्लक्ष केलं आहे, असा नागरिकांचा आरोप आहे.
नागपूरच्या 2 युवकांचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू
गडचिरोली जिल्ह्यातूनही नुकतीच एक हृदयद्रावक घटना समोर आली होती. यात सिरोंचा तालुक्यात दोन युवकांचा गोदावरी नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. सुमन राजू मारसेट्टी (वय 15, रा. आसरअल्ली) आणि हिमांशू मून (वय 22, रा. न्यू बालाजी नगर) नागपूर अशी मृतकांची नावे आहेत. हिमांशू मून हा नागपूर येथून आपल्या काही मित्रांसह कार्यक्रमासाठी सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली येथे गेला होता.