चंद्रपूर : शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रपूर जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आलीय. त्यांच्यावर १२ गुन्हे दाखल असून येत्या ९ ऑक्टोबर रोजी त्यांना उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उपस्थित राहण्याचे आणि स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत. संदीप गिऱ्हे यांना तडीपारीचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्यांच्यावर १२ गुन्हे दाखल आहेत. यात मारहाण, जखमी करणं, अश्लील शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी, हल्ला यांचा समावेश आहे.
advertisement
चंद्रपूर जिल्ह्यातल्या रामनगर, चंद्रपूर, दुर्गापूर, भद्रावती, बल्लारपूर, पोंभुर्णा या पोलीस ठाण्यांमध्ये संदीप गिऱ्हेविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पोंभुर्णा पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांनी गिऱ्हे यांना तडीपार करावं असा प्रस्ताव पाठवलाय. गिऱ्हे यांच्यामुळे सामाजिक स्वास्थ बिघडण्याचा धोका आहे. त्यांना तातडीने तडीपार करावं असं म्हटलंय.
संदीप गिऱ्हे हे शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटातच राहिले. विधानसभा निवडणुकीसाठी ते तयारी करत असून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. गिऱ्हे यांनी तडीपारीच्या नोटीसीवर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, १२ पैकी ८ प्रकरणांमध्ये सुटका झाली आहे. तर ४ गुन्हे शिल्लक आहेत.
बल्लारशा मतदारसंघातून संदीप गिऱ्हे हे शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहे. आपल्याला मिळालेली तडीपारीची नोटीस ही पूर्णपणे राजकीय असून माझ्यावर राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न नोटीस च्या माध्यमातून करण्यात आल्याचा संदीप गिऱ्हे यांचा दावा आहे. माझ्यावर दाखवण्यात आलेल्या 12 पैकी 8 गुन्ह्यांमध्ये माझी आधीच निर्दोष मुक्तता झाली असून उरलेले चार गुन्हे हे राजकीय आंदोलनाचे आहे, त्यामुळे राजकीय आकसापोटी करण्यात आलेल्या कारवाईल कोर्टाच्या माध्यमातून उत्तर देणार असल्याचं संदीप गिऱ्हे यांनी म्हटलंय.