याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नवरात्रौत्सवात अंबाबाईच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. या काळात मंदिराकडे जाणाऱ्या मार्गांवर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी व्यावसायिक, विक्रेते, फेरीवाले यांची अतिक्रमणे हटवण्याच्या सूचना पोलिसांनी महापालिकेला दिल्या आहेत. रस्त्याच्या कडेला लावलेली बंद अवस्थेतील वाहनं, दुकानांचे फलक, खाद्यपदार्थांच्या गाड्या, फेरीवाल्यांचं साहित्य काढण्याचं काम सुरू आहे.
advertisement
सूचना फलकांची व्यवस्था
बाहेरून येणाऱ्या भाविकांना योग्य माहिती मिळावी, यासाठी शहरात ठिकठिकाणी सूचना फलक आणि दिशादर्शक फलक लावण्याचं काम सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने पोलीस आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना हे फलक दिले आहेत.
कशी असेल वाहतूक व्यवस्था?
छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भवानी मंडप, करवीर नगर वाचन मंदिर ते बिंदू चौक, महाद्वार रोड, ताराबाई रोड, भाऊसिंगजी रोड, मिरजकर तिकटी ते बिनखांबी गणेश मंदिर रोडवरील सर्व अतिक्रमणे काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. गर्दीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भवानी मंडप या मार्गावरील वाहतूक देखील बंद ठेवली जाणार आहे.
अवजड वाहनांना बंदी
शहर वाहतूक नियंत्रण शाखेनं दिलेल्या माहितीनुसार, नवरात्रीच्या काळात, दसरा चौक ते व्हीनस कॉर्नर, सुभाष रोड, लक्ष्मीपुरी बाजारपेठ, लक्ष्मीपुरी पोलिस ठाणे ते बिंदू चौक, कॉमर्स कॉलेज ते मिरजकर तिकटी आणि मिरजकर तिकटी ते बिनखांबी गणेश मंदिर या मार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडी होते. यावर उपाययोजना म्हणून खासगी ट्रॅव्हल्स आणि अवजड वाहनांना शहरात प्रवेश दिला जाणार नाही. त्यांना रिंगरोडवरून पर्यायी मार्गांनी वळवलं जाईल.
पार्किंगची सुविधा
महाराणी ताराबाई रोडवरील सरस्वती टॉकीजजवळ महानगरपालिकेने तयार केलेल्या इमारतीत 200 दुचाकी आणि 75 कारसाठी पार्किंगची सोय केली आहे. येत्या रविवारपासून (21 सप्टेंबर) हे पार्किंग सुरू केलं जाणार आहे. याशिवाय शिवाजी स्टेडियमवर देखील पार्किंगची सोय केली जात आहे. याशिवाय बिंदू चौक, खानविलकर पेट्रोलपंपाजवळ 100 फुटी रोड, व्हीनस कॉर्नर गाडी अड्डा अशा 24 ठिकाणी पार्किंगची सोय केली जात आहे.