Chhatrapati Sambhaji Nagar : अविनाश कानडजे (छत्रपती संभाजीनगर) : महाराष्ट्रात तुळशी विवाह म्हणजेच 2 नोव्हेंबर 2025 नंतर लग्नसराईला सूरूवात होणार आहे.तत्पुर्वी चहापाणी, साखरपूडा असे सगळे कार्यक्रम गावोगावी पार पडतायत. अशात आता एका अनोख्या साखरपूड्याची चर्चा छत्रपती संभाजीनगरमध्ये रंगली आहे. कारण तंत्रज्ञानाचा वापर करून व्हिडिओ कॉलद्वारे जोडप्याचा ऑनलाईन साखरपूडा पार पडला आहे. पण अशाप्रकारे साखरपूडा करण्याचं नेमकं कारण काय आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
आजच्या डिजिटल युगात तंत्रज्ञान काय करेल याचा काही नेम नाही. कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये व्हिडिओ कॉलवर साखरपूडा पार पडला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर जवळ असलेल्या फुलेवाडी या गावात असा साखरपूडा पार पडला आहे. या साखरपूड्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
वैजापूर ग्रामीण 1 येथील प्रगती गायकवाड या तरुणीचा साखरपुडा लंडनमध्ये नोकरी करणाऱ्या आशुतोष पुंड तरुणाशी व्हिडिओ कॉलद्वारे पार पडला. मुलगा सध्या लंडनमध्ये प्रतिष्ठित कंपनीत कार्यरत असून, वेळ आणि अंतराच्या मर्यादा लक्षात घेऊन दोन्ही परिवारांनी आधुनिक पद्धतीने साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला. वैजापूर ग्रामीण येथे मुलीच्या घरी पारंपरिक विधी करण्यात आले, तर लंडनहून तरुणाने थेट ऑनलाइन उपस्थिती लावत "होकार" दिला.
समारंभात नातेवाईकांनी टाळ्यांच्या गजरात शुभेच्छांचा वर्षाव केला. ‘व्हिडिओ कॉल’च्या माध्यमातून झालेला हा साखरपुडा परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. या साखरपूड्याला स्थानिक नातेवाईकांसह अनेक नातईवाईक पाहुणे उपस्थित होते.
मुलगा (आशुतोष) लंडनला नोकरी करतो. पण मधल्या काळात 8 दिवसांसाठी तो आपल्या पुण्याच्या घरी आला होता. पुण्यात आल्यानंतर त्यांनी आम्हाला फोन केला आणि घरात मुलगी बघून ते परत गेले. त्यानंतर त्यांनी आम्हाला मुलगी पसंत असल्याचे कळवले. त्यानंतर त्यांची आठ दिवसांची सुट्टी संपल्यामुळे ते पुन्हा लंडनला निघून गेले. पण त्यांनी त्यांच्या वडिलांना हे लग्न ठरवण्यास सांगितले आणि ते लंडनला गेले,असे मुलीच्या वडिलांनी सांगितले.
सगळं ठरल्यानंतर साखरपूडा करण्याचं आमचं ठरलं. पण मुलाला सुट्टी नव्हती. त्यामुळे मुलाने सांगितले मला सुट्टी भेटणार नाही तुम्ही साखरपूडा करून घ्या. त्यानंतर आम्ही ऑनलाईन मुलाला कनेक्ट करून साखरपूडा उरकला,अशी माहिती वडिलांनी दिली.