महामार्गावर मोठे खिळे...
छत्रपती संभाजीनगरच्या समृद्धी महामार्गावरील माळीवाडा इंटरचेंजजवळ असलेल्या पुलावर मोठ-मोठे खिळे मारण्यात आले होते. या खिळ्यांमुळे अनेक वाहने पंक्चर झाल्याचा दावा करण्यात आला होता. हा सगळा प्रकार सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आल्यानंतर खळबळ उडाली.
समृद्धीवर खिळे की आणखी काही....
पोलीस आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) यावर स्पष्टीकरण देत खिळे नसून दुरुस्तीच्या प्रक्रियेत वापरले जाणारे नोजल असल्याचे सांगितले आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पुलावरील मजबुतीकरण आणि देखभाल कामासाठी ग्राऊटिंग प्रक्रिया सुरू होती. या प्रक्रियेत काँक्रीट मजबूत करण्यासाठी नोजल लावले जातात. दुरुस्ती काम पूर्ण झाले असून, त्यावेळेस वाहतुकीसाठी डायव्हर्जन देण्यात आले होते. नियोजनानुसार सकाळी सर्व नोजल कापून काढायचे होते. मात्र काही वाहनं चुकून त्या लेनमध्ये गेल्याने त्यांचे टायर पंक्चर झाले असल्याचे सांगण्यात आले.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी सर्व नोजल वेळेवर कापून टाकण्यात आले आहेत आणि सध्या महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे. तसेच पुढील काळात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी अधिक दक्षता घेतली जाईल, असे आश्वासनही देण्यात आले आहे. या घटनेमुळे वाहनचालकांना झालेला त्रास मान्य करत प्रशासनाने तांत्रिक कारणांमुळे ही अडचण निर्माण झाल्याचे कबूल केले आहे. आता महामार्गावरील दुरुस्ती कामकाज अधिक काळजीपूर्वक हाताळण्याची मागणी वाहन चालकांकडून होत आहे.
