हर्षदा पद्माकर तायडे असं मृत आढळलेल्या २४ वर्षीय नर्सचं नाव आहे. रविवारी तिचा मृतदेह हॉस्पिटलच्या स्वच्छतागृहात बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंजेक्शन घेतल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हर्षदा तायडे ही एम्स हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून काम करत होती. रविवारी दुपारी बराच वेळ ती तिच्या जागेवर दिसली नाही. तिच्या सहकाऱ्यांनी तिला फोन केला असता, तिने आपण स्वच्छतागृहात असल्याचे सांगितले. मात्र, बराच वेळ होऊनही ती परत न आल्याने तिच्या सहकाऱ्यांना शंका आली. त्यांनी जाऊन पाहिले असता, ती स्वच्छतागृहात बेशुद्ध अवस्थेत आढळून आली.
advertisement
यावेळी, तिच्याजवळ एक इंजेक्शनही सापडले. हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी तात्काळ तपासणी केली असता, इंजेक्शन घेतल्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.
हर्षदाच्या मृत्यूचे नेमके कारण काय, तिने स्वतःहून इंजेक्शन घेतले की आणखी काही कारण आहे, याचा तपास करण्यासाठी मृतदेह विच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. सध्या या घटनेची नोंद सिडको पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.