संतोष काळे यांच्या ‘पूजा ऑटो पार्ट’ या गॅरेजमध्ये सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अचानक आग भडकली. पहाटे नमाज अदा करून मशिदीतून बाहेर पडलेल्या काही मुस्लिम तरुणांनी आगीचे लोळ आणि धूर पाहताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
कमानीवर झेंडा लावायला गेला अन् घात झाला, 24 वर्षीय तरुण जागेवरच संपला, सोलापूर हळहळलं!
परिस्थितीचे गांभीर्य ओळखत त्यांनी गॅरेजचे शटर उघडून आत अडकलेले साहित्य बाहेर काढण्यास सुरुवात केली. याचदरम्यान दुकानात ठेवलेली भगवान महादेवांची मूर्तीही आगीच्या विळख्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र एका मुस्लिम तरुणाने पुढाकार घेत अत्यंत श्रद्धेने ती मूर्ती सुरक्षित बाहेर काढली. या कृतीने उपस्थितांच्या मनाला स्पर्श केला.
advertisement
धर्माच्या सीमा ओलांडून केलेल्या या मदतीमुळे परिसरात एकात्मतेचे सुंदर उदाहरण पाहायला मिळाले. स्थानिक हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकजुटीने प्रयत्न केल्याने आग अधिक पसरण्यापासून रोखण्यात यश आले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, या आगीत गॅरेजमधील मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले असून, व्यावसायिक संतोष काळे यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कठीण प्रसंगी धर्मापलीकडे जाऊन मदतीचा हात देणाऱ्या मुस्लिम तरुणांचे सर्वत्र कौतुक होत आहे.






