इन्स्टावरून ओळख, प्रेमासाठी घर सोडलं, उत्तराखंडमधून थेट संभाजीनगर गाठलं, पण ‘तिच्या’सोबत भयंकर घडलं!
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Instagram Love Story: चॅटिंग आणि फोनवरील गप्पांमुळे जवळीक वाढत गेली. या नात्यावर विश्वास ठेवून ती तरुणी थेट छत्रपती संभाजीनगरमध्ये आली.
छत्रपती संभाजीनगर: सोशल मीडियावर जुळलेली नाती प्रत्यक्ष आयुष्यात किती वेगळी ठरू शकतात, याचा हृदयद्रावक अनुभव एका तरुणीला आला. उत्तराखंडमधील ‘नेहा’ (नाव बदलले आहे) हिने इन्स्टाग्रामवरून ओळख झालेल्या छत्रपती संभाजीनगरमधील तरुणावर विश्वास ठेवत स्वतःचे घर सोडले; मात्र त्याच नात्याने तिची फसवणूक केली.
इन्स्टाग्रामवरून ओळख झाल्यानंतर दोघांमध्ये सतत संवाद सुरू झाला. चॅटिंग आणि फोनवरील गप्पांमुळे जवळीक वाढत गेली. या नात्यावर विश्वास ठेवून ती तरुणी थेट छत्रपती संभाजीनगरमध्ये आली. सुरुवातीला त्या तरुणाने काही दिवस तिला सोबत ठेवले; पण नंतर अचानक तिला नाकारले.
सुमारे तीन महिन्यांपूर्वी नेहा पुन्हा उत्तराखंडमध्ये आपल्या घरी परतली. मात्र, आई-वडिलांनी तिला स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून ती आपल्या आत्याकडे राहत होती. तरीही तिच्या अडचणी संपल्या नाहीत. संबंधित तरुण सतत फोन आणि मेसेज करून तिला त्रास देत राहिला. कुटुंबाचा आधार तुटलेला आणि वाढता मानसिक ताण यामुळे तिने पुन्हा छत्रपती संभाजीनगरचा रस्ता धरला.
advertisement
संभाजीनगरमध्ये आल्यानंतर नेहाने शेंद्रा एमआयडीसी परिसरात नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला; मात्र तिला यश आले नाही. शेवटी परिस्थितीला कंटाळून तिने हर्सूल पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनीही तातडीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली. या प्रकरणात पोलिस निरीक्षक स्वाती केदार, गणेश केदार पोलीस उप निरीक्षक राकेश देशमुख, अंमलदार आशिफा पटेल तसेच ‘माणुसकी’ समूहाचे सुमित पंडित व पूजा पंडित, प्रा. शरद सोनवणे यांनी मदत केली.
advertisement
तरुणीला तात्पुरत्या निवाऱ्यासाठी ‘माणुसकी वृद्ध सेवालय’ येथे ठेवण्यात आले. पोलिस तपासादरम्यान तिची वैद्यकीय स्थिती समोर आली. तिला क्षयरोग असल्याचे समजताच त्या तरुणाने तिला स्वीकारण्यास नकार दिल्याचे स्पष्ट झाले. शेवटी, तिने आपल्या आत्याकडे परत जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार पोलिस आणि माणुसकी संस्थेच्या मदतीने मंगळवारी रात्री तिला सुरक्षितपणे रेल्वेत बसवण्यात आले. सोशल मीडियावर तयार होणाऱ्या नात्यांकडे डोळसपणे पाहणे किती गरजेचे आहे, हे दाखवणारी ही घटना अनेकांसाठी धडा ठरू शकते.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Mar 25, 2026 11:18 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
इन्स्टावरून ओळख, प्रेमासाठी घर सोडलं, उत्तराखंडमधून थेट संभाजीनगर गाठलं, पण ‘तिच्या’सोबत भयंकर घडलं!







