हिंगोली येथील रहिवासी अब्दुल अबित मुजीब हा एमजीएममध्ये बीटेकचे शिक्षण घेत असून शनिवारी रात्री तो आपल्या नातेवाइकांसह जयभवानीनगर येथे जेवणासाठी गेला होता. जेवण आटोपून सर्वजण सिटर रिक्षाने घरी परतत असताना मध्यरात्री सुमारे बारा वाजताच्या सुमारास मोंढा नाका पुलावर भरधाव कारने रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका भीषण होता की अख्तर रज्जा रिक्षातून फेकले जाऊन थेट पुलाखाली कोसळले, तर पाच वर्षांची जोहरा जागीच मृत्युमुखी पडली.
advertisement
या अपघातात गंभीर जखमी झालेली अलिझा ही सात महिन्यांची गर्भवती होती. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. आई सध्या मृत्यूशी झुंज देत असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. जन्म घेण्याआधीच बाळाचा जीव गेल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अपघातानंतर कारचालक कश्यप पटेल घटनास्थळावरून पसार झाला होता. मात्र जवाहरनगर पोलिसांनी त्याला अटक केली असून न्यायालयाने त्याला 23 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. प्राथमिक तपासात आरोपी हा नातेवाइकांचे गॅदरिंग संपवून लाँग ड्राइव्हसाठी निघाल्याचे समोर आले आहे. शहरात परतताना मोंढा नाका पुलावर त्याने कारचा वेग प्रचंड वाढवला आणि घाईघाईत निष्पाप प्रवाशांच्या रिक्षाला धडक दिली.
एका क्षणाच्या बेदरकारपणामुळे हसत-खेळत घरी परतणारे कुटुंब कायमचे उद्ध्वस्त झाले. मामा-भाचीसह गर्भातील बाळाचा जीव गेल्याने या अपघाताने केवळ तीन जीव नाही, तर अनेक स्वप्नेही हिरावून घेतली आहेत.
