छत्रपती संभाजीनगर : राज्यातील स्थानिक संस्थांमधील पर्यावरणाच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वांवर आधारित 'माझी वसुंधरा' अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये माझी वसुंधरा 4.0 या अभियाना अंतर्गत छत्रपती संभाजीनगर महापालिकेला विभागातील सर्व जिल्ह्यांमधून प्रथम येण्याचा मान मिळाला आहे. तसेच प्रथम पुरस्कारासाठी छत्रपती संभाजीनगर महापालिकेला दीड कोटींचे बक्षीस मिळाले आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांनी याबाबतची माहिती दिली.
advertisement
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, महापालिका प्रशासनाने घनकचरा व्यवस्थापन, वृक्षारोपण, प्रदूषण कमी करण्यासाठी केलेल्या कामांची दखल घेत राज्य शासनाने विभागामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या महापालिकेला हा पुरस्कार दिला आहे. माझी वसुंधरा हे अभियान स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये 2 ऑक्टोबर 2020 पासून राबविण्यात सुरुवात केले.
दरम्यान, मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी पदभार स्वीकारल्यापासून छत्रपती संभाजीनगर शहरात स्वच्छता पर्यावरण आदी विषय गांभीर्याने हाताळले. महानगरपालिकातर्फे विविध प्रकारची स्वच्छता व पर्यावरणासंदर्भात जनजागृती केली जात आहे. शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण, घनकचरा व्यवस्थापनात प्रयत्न केले जात आहेत.
मनपाने शहर सौंदर्यकरणाकडे लक्ष दिले. हवेची गुणवत्ता सुधारावी यासाठी प्रयत्न केले. यासोबतच खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत विविध विकासकामे केली. पारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर व्हावा, यासाठी शहरात एलईडी पथदिवे बसविण्यात आले. महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीवर सोलर पॅनल बसवण्यात आले.
या सर्व कामांवरूनच महानगरपालिकेला प्रथम येण्याचा मान मिळालेला आहे आणि त्यासोबतच दीड कोटी रुपयांचे बक्षीस देखील जाहीर झाले आहे. हे मिळालेले बक्षीस जास्तीत जास्त जनतेची कामे करण्यासाठी वापरणार आहोत, अशी माहिती मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी यावेळी दिली.