'ती' ओळख ठरली जीवघेणी
पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार, सन 2023 मध्ये ती एका खासगी कंपनीत काम करत होती. याच दरम्यान तिची ओळख नितीन ( 24 रा. एमआयडीसी परिसर) या सुपरवायझरशी झाली. ओळखीचे पुढे प्रेमसंबंधात रूपांतर झाले. या नात्याचा गैरफायदा घेत आरोपीने ऑगस्ट 2024 मध्ये तिला रांजणगाव येथील शिवनेरी कॉलनीतील आपल्या निवासस्थानी राहण्यासाठी नेले.
advertisement
त्या ठिकाणी आरोपीने तिच्यावर वारंवार जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केले. मद्यपान करून मारहाण करत लग्नासाठी दबाव टाकला जात होता. तरुणीने लग्नास नकार दिल्यानंतर तिचा छळ अधिकच वाढल्याचा आरोप आहे. 31 जुलै ते 1 ऑगस्ट 2025 या कालावधीत तिला खोलीत कोंडून ठेवल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
आरोपीच्या छळातून अखेर पीडित तरुणी निसटली
अत्यंत भीतीच्या वातावरणात संधी साधत पीडित तरुणी 3 ऑगस्ट रोजी तेथून निसटली आणि 4 ऑगस्ट रोजी यवतमाळ येथील आपल्या घरी पोहोचली. मात्र, त्यानंतरही आरोपीने तिला फोनद्वारे फोटो व्हायरल करण्याची तसेच खून करण्याची धमकी दिल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकारामुळे मानसिकदृष्ट्या खचलेल्या तरुणीने अखेर धैर्य एकवटत पोलिसांत तक्रार दाखल केली. सध्या पोलिसांकडून या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
