डॉ. शहाबुद्दीन पठाण यांचा जबाब नोंदवला
याप्रकरणी डॉ. शहाबुद्दीन नसिरुद्दीन पठाण यांनी सिडको पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा त्यांचा सविस्तर जबाब नोंदवून घेतला आहे. कल्पना भागवतने आयएएस अधिकारी असल्याची बतावणी करून त्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर त्यांच्याकडून पैसे उकळले. एका उच्च शिक्षित व्यक्तीला अशाप्रकारे कल्पनाने गंडा घातल्याने चर्चांना उधाण आलं आहे. कल्पना भागवतने आतापर्यंत अशाप्रकारे अनेक उच्चभ्रू व्यक्तींना आणि प्रतिष्ठित अधिकाऱ्यांना आपला शिकार बनवल्याचा संशय आहे. फसवणुकीची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता असल्याने पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
advertisement
मुख्य आरोपींची कसून चौकशी
गेल्या दोन दिवसांपासून तपास यंत्रणा तोतया महिला आयएएस अधिकारी कल्पना भागवत, केंद्रीय मंत्र्यांचा ओएसडी म्हणून मिरवणारा डिम्पी देवेंद्रकुमार हरजाई आणि अशरफ या तिघांचीही कसून चौकशी करत आहेत. हे तिघे एकमेकांच्या संपर्कात कसे आले, किती वेळा भेटले, अशरफने त्याचा भाऊ गिल याला कल्पनाच्या संपर्कात का आणले आणि त्यामागे त्याचा नेमका उद्देश काय होता, यांसारख्या अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर तपास केंद्रीत करण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय संबंधांची शक्यता
तपासादरम्यान आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. कल्पना भागवतचा प्रियकर अफगाणिस्तानचा असून त्याचा भाऊ पाकिस्तानमध्ये वास्तव्यास आहे. या दोघांसोबतही कल्पनाचा संपर्क असल्याचे पोलिसांना आढळले आहे. त्यामुळे या घोटाळ्याचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरावर जोडले गेले आहेत की काय, या दिशेनेही पोलीस तपास करत आहेत.
