3 नोव्हेंबर रोजी भेंडाळा फाट्यावर अपघात झाला आणि त्यात जखमी अवस्थेत मिळालेला युवक म्हणजे हाच मुकेश. 108 अॅम्ब्युलन्सने त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. उपचार सुरू असताना लक्षात आलं, की तो केवळ गुजरातीच बोलू शकतो. नाव, गाव, ओळख…काहीच स्पष्ट सांगू शकत नव्हता. तो बरा होऊन डिस्चार्ज मिळण्याची वेळ आली, पण कुटुंब कुठलं? त्याला नेमकं कोणाकडे पाठवायचं? हीच सर्वात मोठी अडचण होती.
advertisement
Pune News: आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्यांनो आता खैर नाही! पुण्याचा तरुण गजाआड
याचवेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभिजित खंदारे यांनी पुढाकार घेतला. सामाजिक कार्यकर्ते फैसल बासोलान यांच्या मदतीने गुजराती जाणकारांचा शोध सुरू झाला. शहरातील रहिमभाई खलीफा रुग्णालयात पोहोचले आणि मुकेशशी प्रेमाने संवाद साधला. काही मिनिटांतच त्याने आपलं नाव मुकेश लालजीभाई गामेती असल्याचं सांगितलं आणि गुजरातमधील घरचा पत्ता सांगितला. इथून कथेला नव्या वळणाची सुरुवात झाली.
फैसल बासोलान यांनी गुजरात पोलिसांशी संपर्क साधला. काही तासांतच ही माहिती मुकेशच्या परिवारापर्यंत पोहोचली. 19 नोव्हेंबरला त्याचे भाऊ मन्नुभाई आणि कालुभाई, तसेच भावजयी अरुणाबेन धावतच गंगापूरला आले. रुग्णालयात भावाला पाहताच त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. कोरोना काळात बेपत्ता झालेला मुकेश आता त्यांच्या समोर जिवंत, सुरक्षित, आणि हसत उभा होता. त्या क्षणाला त्यांच्याकडे शब्दच नव्हते. उपजिल्हा रुग्णालयातील टीम, डॉ. खंदारे आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळे एका घरात पुन्हा आनंद परतला.
