Pune News: आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्यांनो आता खैर नाही! पुण्याचा तरुण गजाआड
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
Pune News: अनेकदा मोठं होताच मुलंच आपल्या आई-वडिलांचे हे कष्ट आणि प्रेम विसरतात. आई-वडिलांचा म्हातारपणातील आधार बनण्यास नकार देतात.
जुन्नर : आई-वडील अगदी प्रेमाने आणि काळजीने आपल्या मुलांचं पालनपोषण करतात. त्यांना मोठं करून शिक्षण देतात, कमवायला शिकवतात. मात्र, अनेकदा मोठं होताच मुलंच आपल्या आई-वडिलांचे हे कष्ट आणि प्रेम विसरतात. आई-वडिलांचा म्हातारपणातील आधार बनण्यास नकार देतात. अशावेळी त्या वृद्ध आई-वडिलांवर मोठं संकट कोसळतं. मात्र, हे असं करणं आता मुलांना महागात पडू शकतं. होय, वृद्ध आई-वडिलांचं पालनपोषण न करणाऱ्या एका मुलाला जुन्नर न्यायालयाने 3 महिने सश्रम कारावास आणि 5 हजार दंडाची शिक्षा सुनावली आहे
जुन्नर तालुक्यातील निमगावसावा येथील ही घटना असल्याची माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक यांनी दिली. निमगाव सावा येथील रहिवासी विठ्ठल बाबूराव गाडगे यांचं वय 80 वर्ष आहे. त्यांना लक्ष्मण विठ्ठल गाडगे (वय 49) आणि सुनील विठ्ठल गाडगे (वय 53) अशी दोन मुलं आहेत. मात्र, दोन मुलं असूनही वयोवृद्ध विठ्ठल गाडगे यांना स्वतःच स्वतःचा उदरनिर्वाह करावा लागत आहे.
advertisement
याच कारणामुळे विठ्ठल गाडगे यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात आपल्याच दोन्ही मुलांविरोधात तक्रार दिली. यानुसार, विठ्ठल गाडगे यांच्या नावे असलेल्या घरातच मुलं राहतात. त्यामुळे ते घराचा आणि जमिनीचा उपभोग घेतात. मात्र, असं असतानासुद्धा आपल्याला आणि आपल्या पत्नीला जेवण, कपडे देत नाहीत आणि पालनपोषणही करीत नाहीत, अशी तक्रार विठ्ठल गाडगे यांनी केली. या तक्रारीवरून नारायणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
advertisement
या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून दोषारोपपत्र जुन्नर न्यायालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर या प्रकरणावर निकाल देताना जुन्नर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अनंत बाड यांनी आई-वडिलांचं पालनपोषण न केल्याने मुलगा लक्ष्मण विठ्ठल गाडगे याला 3 महिने सश्रम कारावास आणि 5 हजार दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. या निर्णयामुळे आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना आणि चांगलाच धडा मिळणार आहे. तसंच सांभाळ न करणाऱ्या मुलांची तक्रार आई-वडील पोलिसांकडे करू शकतात.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 21, 2025 1:18 PM IST


