रमाबाई विलास जमधडे (३८) आणि विलास रामभाऊ जमधडे असं आत्महत्या करणाऱ्या पती-पत्नीची नावं आहेत. शुक्रवारी सायंकाळी आळंद येथील पिंपरी शिवारातील एका विहिरीत रमाबाई जमधडे यांचा मृतदेह आढळला होता. शनिवारी दुपारी १२ वाजता ग्रामस्थांच्या उपस्थितीत रमाबाई यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पत्नीच्या अंत्यविधीनंतर काही तासांतच, शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांचे पती विलास जमधडे यांनी त्याच विहिरीच्या बाजूला असलेल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी विलास जमधडे यांनी एका गावातील ग्रुपवर भावनिक पोस्ट केली होती. आपल्यावर बँकेचं कर्ज आहे. त्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं होतं.
advertisement
'माझ्यावर ग्रामीण बँकेचे कर्ज असून मी आत्महत्या करत आहे. काल माझ्या पत्नीने आत्महत्या केली. अमित व सुमीत मुलांनो मला माफ करा. तुम्ही शिक्षण आळंद येथेच पूर्ण करा," असा हृदय हेलावून टाकणारा संदेश त्यांनी मुलांसाठी लिहिला.
विलास जमधडे यांनी कर्जाच्या ओझ्यामुळे आत्महत्या केल्याचे त्यांच्या संदेशातून स्पष्ट झाले आहे. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. एकाच कुटुंबातील पती-पत्नीने काही तासांतच जीवन संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.