बुलडाणा पोलिसांनी अलीकडे सोनसाखळी चोरीप्रकरणी दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली. मात्र अटकेनंतर त्यांनी केवळ दागिनेच नाही, तर एक खूनही कबूल केला आणि पोलिसांनाही धक्काच बसला. या दोघांनी 26 मे 2024 रोजी गंगापूर तालुक्यातील शेंदुरवादा गावात मध्यरात्री चोरीसाठी घरात शिरताना प्रतिकार करणाऱ्या 78 वर्षीय नारायण निकम यांचा पहाराने ठार मारले होते. त्यानंतर त्यांच्या सुनेलाही मारहाण करत घरातील साहित्य घेऊन फरार झाले होते.
advertisement
या घटनेनंतर पुरावे मिळत नव्हते, त्यामुळे तपासाला दिशा लागत नव्हती आणि पोलिसांवरही टीकेची झोड उठली होती. पण म्हणतात ना, गुन्हा कितीही शिताफीने केला तरी एक ना एक दिवस सत्य समोर येतेच.
या प्रकरणाचा उलगडा झाला तो केवळ एका चोरीच्या दुचाकीमुळे. सोनसाखळी प्रकरणात पकडलेल्या आरोपींकडून जी दुचाकी जप्त झाली. ती वाळूज परिसरातून चोरीला गेलेली असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे वाळूज पोलिसांनी यामागचा तपास सुरू केला. चौकशीत आरोपी महेश काळे आणि मंजू पवार यांनी दीड वर्षांपूर्वीच्या खुनाची कबुली दिली.
या प्रकरणात वाळूज पोलिसांनी दाखवलेल्या चिकाटीचे सर्वत्र कौतुक होत आहे. उपनिरीक्षक अजय शितोळे, अंमलदार सुधाकर पाटील, नितीन धुळे यांच्या कामगिरीने हे गूढ अखेर उलगडले.