अंत्यविधीसाठी बाहेर जाणं ठरलं निमित्त?
सासरचे बाहेर गेले अंत्यविधीसाठी गेले अन् घरातील सुनेचा घरी अंत झाला; माहेरच्यांनी सासरच्या मंडळीवर केला हत्येचा संशय. सुनीता या सिल्लोड तालुक्यातील मोढा खुर्द येथील शिवाजी गवळी यांची मुलगी असून बारा वर्षांपूर्वी त्यांचा विवाह वाणेगाव येथील अण्णा भोकरे याच्याशी झाला होता. या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. मंगळवारी सकाळी सुनीताचे सासू, सासरे आणि जाऊ हे विरमगाव येथे नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी गेले होते. याच दरम्यान दुपारी 2 ते 3 वाजेच्या सुमारास सुनीता घराबाहेर पडल्या. मात्र त्या घरी परत न आल्याने सायंकाळपासून त्यांचा शोध सुरू करण्यात आला. अखेर बुधवारी सकाळी गावाजवळील एका विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला.
advertisement
पोलिसांनी मृतदेह फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात आणला. मात्र, सासरच्या मंडळींनीच तिची हत्या केल्याचा आरोप करीत माहेरच्या नातेवाइकांनी शवविच्छेदनास नकार दिला. तसेच इन-कॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणी केली. त्यानंतर मृतदेह छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात नेण्यात आला. तेथे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह थेट फुलंब्री पोलिस ठाण्यात आणण्यात आला. खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात यावी या मागणीसाठी नातेवाइकांनी पोलिस ठाण्यासमोरच मृतदेह ठेवून आंदोलन छेडले. कायदा आणि सुव्यवस्था नीट राहावी यासाठी दंगा काबू पथक तैनात करण्यात आले होते.
जेसीबी खरेदीसाठी सुनीता यांचा सातत्याने छळ
जेसीबी खरेदीसाठी माहेरहून दोन लाख रुपये आणावेत, यासाठी सुनीता यांचा सातत्याने छळ केला जात असल्याची तक्रार मयत महिलेचे भाऊ गजानन गवळी यांनी दिली आहे. या तक्रारीवरून पती अण्णा भोकरे, सासू मनूबाई भोकरे, सासरा राजाराम भोकरे, जाऊ गंगूबाई संतोष भोकरे, नणंद भागीनाथ गायकवाड आणि नणंद राजू कारले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी व्हिडीओ कॉलद्वारे दाखवल्यानंतरच नातेवाइकांनी आंदोलन मागे घेतले. त्यानंतर रात्री 11:30 वाजता वाणेगाव येथे सुनीता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
