भागवत ज्ञानोबा मुलगीर असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. तो सध्या महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक येथे पोलिस उपनिरीक्षक पदाचं प्रशिक्षण घेत आहे. आरोपी मुलगीरने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. अत्याचाराची ही घटना २४ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी क्रांती चौक परिसरातील एका कॅफेमध्ये घडली होती.
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, अत्याचारानंतर जेव्हा तिला गर्भधारणा झाली, तेव्हा आरोपी मुलगीरने तिच्यावर गर्भपात करण्यासाठी दबाव टाकला आणि तिला त्यासाठी भाग पाडले. या सर्व प्रकारानंतर पीडितेने अखेर शनिवारी क्रांती चौक पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.
advertisement
गुन्हा दाखल होताच पोलीस यंत्रणा तत्काळ सक्रिय झाली. आरोपी भागवत मुलगीर याला नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमी येथून अटक करण्यात आली. त्याला छत्रपती संभाजीनगर येथे आणल्यानंतर न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सागर देशमुख यांनी दिली.
आरोपीच्या कुटुंबीयांकडूनही धमक्या
पीडितेने जेव्हा या अत्याचाराची माहिती आरोपी भागवत मुलगीर याचे वडील आणि बहिणीला दिली, तेव्हा त्या दोघांनीही मदतीऐवजी पीडितेलाच शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर, त्यांनी पीडितेला 'तुला जे करायचे ते कर, आम्ही कोण आहोत ते तुला माहीत नाही' असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली. प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याकडूनच असे कृत्य घडल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. क्रांती चौक पोलिस पुढील तपास करत आहेत.
