उद्यानातील सुरक्षारक्षकांशी सततचा वाद, अश्लील हावभाव, तसेच अंगावर धावून जाण्यासारखे प्रकार वाढत असल्याने मनपा प्रशासनाने उद्यानाची वेळ एक तासाने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता सिद्धार्थ उद्यान संध्याकाळी 7 वाजता नव्हे तर 6 वाजताच बंद करण्यात येणार आहे. प्रशासक जी. श्रीकांत यांनी या गोष्टीला मंजुरी दिली आहे.
विशेषतः दुपारनंतर सिंह, वाघ, बिबटे किंवा सर्पालय पाहण्यासाठी होणारी गर्दी वाढली की 15 ते 25 वयोगटातील काही तरुणांकडून अरेरावीचे प्रकार अधिक प्रमाणात दिसून येत होते. पोलिस गस्त आणि दामिनी पथक असूनही, ते निघून गेल्यावर पुन्हा वाद होण्याची मालिका सुरूच राहत होती. सुरक्षारक्षकांपर्यंतच नव्हे तर उद्यानात आलेल्या कुटुंबीयांनाही याचा फटका बसत होता.
advertisement
या सर्व घडामोडींवर नागरिकांकडून सातत्याने होत असलेल्या तक्रारी लक्षात घेऊन उद्यान अधीक्षक विजय पाटील यांनी उद्यानाची वेळ कमी करण्याचा प्रस्ताव सादर केला. सध्या हिवाळ्यात संध्याकाळ लवकर होत असल्याने, 6 वाजता तिकीटबंदी आणि त्यानंतर उद्यान पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उन्हाळ्यात परिस्थिती सुधारल्यास पूर्वीप्रमाणे 7 वाजेपर्यंत वेळ वाढवता येईल, अशी मनपा प्रशासनाची भूमिका आहे.मनपाचा हा निर्णय सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत असली तरी टवाळखोरांवर औचित्यपूर्ण कारवाई न करता उद्यानाची वेळ कमी केल्याने अनेक नागरिकांनी नाराजीही व्यक्त केली आहे.
