मुंबई : स्वराज्य स्थापून रयतेच्या राज्याचे स्वप्न साकारणाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल देशातच नव्हे तर देशभरातही त्यांच्याबाबत आदराची भावना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून राजकारण केले जात असताना दुसरीकडे उत्तर प्रदेशात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंजूर झालेल्या पुतळ्याला अटकाव केला जात आहे. लखनऊ महापालिकेकडून यामध्ये खोडा घातला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणावरून उत्तर प्रदेश मराठी समाजाने संताप व्यक्त केला आहे.
advertisement
उत्तर प्रदेशात मराठी भाषिकांची संख्या चांगली आहे. लखनऊ, वाराणसी, कानपूर, झाशी, प्रयागराज आदी शहरात जवळपास एक लाखाच्या घरात मराठी भाषिकांची संख्या आहे. या मराठी भाषिकांनी मराठी समाज उत्तर प्रदेश ही संस्था स्थापन केली आहे. लखनऊमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यासाठी मागील दोन वर्षांपासून संस्थेकडून पाठपुरावा सुरू आहे.
शिवाजी महाराजांचा ब्रासचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यासाठी संस्थेने उत्तर प्रदेश सरकारकडे परवानगी मागितली होती. 14 ऑक्टोबर 2023 रोजी संस्थेचे अध्यक्ष उमेशकुमार पाटील यांच्याकडून सादर झालेल्या निवदेनावर उत्तर प्रदेशातील योगी सरकारकडून 10 ऑक्टोबर 2024 रोजी मंजुरी दिली. 9 जानेवारी 2025 रोजी उत्तर प्रदेशचे पर्यटन आणि सांस्कृतिकमंत्री जयवीर सिंह यांनी संस्थेला पत्र पाठवले. या पत्रात त्यांनी 27 लाख पाच हजारांची तरतूद पुतळ्यासाठी करण्यात आल्याचे पत्र पाठवले. ही रक्कम राज्य ललित अकादमीकडे वर्ग करण्यात येईल, असेही एका पत्रात म्हटले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी ललित कला अकादमीमार्फत होईल, असे स्पष्ट करणारे पत्र ५ एप्रिल रोजी अकादमीकडून 'मराठी समाज'ला मिळाले.
गणेशोत्सवानंतर सूत्र फिरली, शिवरायांच्या पुतळ्याला विरोध!
कृषी आणि आयटी विद्यापीठाजवळच्या चौकात शिवरायांचा पुतळा उभारणीसाठी 27 लाख रुपयांपैकी 20 लाख 28 हजारांची रक्कम मंजूर करण्यात आल्याचे संस्थेला पत्राद्वारे 5 एप्रिल रोजी सांगण्यात आले. मात्र, त्यानंतर सगळंच चित्र बदलले असल्याचे संस्थेने सांगितले. मराठी समाजाने दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव साजरा केला. यावेळी पर्यटन आणि सांस्कृतिकमंत्री जयवीर सिंह यांनी हजेरी लावली आणि महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होईल असे सांगितले. मात्र, त्यानंतर सूत्रे फिरली आणि नियोजित जागेवर साहित्यिक अमृतलाल नागर यांचा स्मारक स्तंभ उभारण्यासाठीच्या निविदेची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध?
दरम्यान, दैनिक 'महाराष्ट्र टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, लखनऊच्या मराठी समाजाच्या प्रतिनिधींनी महापौर सुषमा खरकवाल यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी 'नागर यांच्या स्मारकाच्या उभारणीसाठी महापालिकेच्या कार्यकारिणीमध्ये प्राथमिक ठराव मंजूर करण्यात आल्याची माहिती दिली. मात्र, हा ठराव हा प्राथमिक स्वरूपाचा असून, पुढील कार्यकारिणी बैठकीत तो अंतिम मंजुरीसाठी येईल, अशी माहिती समोर आली. या बैठकीत शिवपुतळ्याच्या निर्णयाला विरोध केला जाईल, असेही सांगण्यात आले.