जात पडताळणीसाठी अर्ज
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील एका तक्रारदाराने आपल्या मुलीला डी.एड. अभ्यासक्रमात प्रवेश मिळवण्यासाठी तसेच पत्नीच्या नोकरीसाठी जात पडताळणी प्रमाणपत्राची आवश्यकता असल्याने २०२० मध्ये अर्ज केला होता. हा अर्ज ऑनलाइन तसेच प्रत्यक्ष ठाणे शहरातील चरई परिसरातील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, कोकण विभागाच्या कार्यालयात सादर करण्यात आला होता.
फाईल मंजुरीसाठी लाचेची मागणी
advertisement
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, अर्जाची फाईल मंजूर करून देण्यासाठी उपसंचालक मीनाक्षी उन्हाळे यांनी अडीच लाख रुपयांची लाच मागितली. या प्रकरणाची माहिती तक्रारदाराने १२ फेब्रुवारी रोजी एसीबीच्या रायगड विभागाकडे दिली.
एसीबीचा सापळा यशस्वी
तक्रारीची पडताळणी एसीबीकडून दुसऱ्याच दिवशी करण्यात आली. पडताळणीत लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्यानंतर एसीबीने सापळा रचला. पोलिस उपअधीक्षक सरिता भोसले आणि पोलिस निरीक्षक निशांत धनवडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ठाणे येथील कार्यालयात कारवाई केली.
दरम्यान, तक्रारदाराकडून अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारताना मीनाक्षी उन्हाळे यांना त्यांच्या केबिनमध्येच रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले.
