राज्यातील सत्ताधारी महायुतीतील हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात काल रात्री पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
महापालिका निवडणुकीबाबत काय झाली चर्चा?
advertisement
सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि अमरावती महापालिकेच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढवण्याची भूमिका या बैठकीत स्पष्टपणे मांडली. मात्र, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीत सहभागी होण्याची तयारी असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना कळवले असल्याची माहिती आहे.
मुंबईतील जागा वाटपाच्या चर्चेत भाजपने नवाब मलिक यांना विरोध केला आहे. राष्ट्रवादीकडून मुंबईतील पक्षाची धुरा ही नवाब मलिकांकडे सोपवण्यात आली आहे. मात्र, भाजपने मलिकांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळासोबत जागा वाटपाची चर्चा करणार नसल्याचे भाजपकडून सांगण्यात आले होते. तर, राष्ट्रवादी मलिकांच्या नेतृत्वावर ठाम राहिले. या मुद्यावरही फडणवीसांसोबत झालेल्या बैठकीत मध्यममार्ग काढण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
मुंबईतील जागावाटपाबाबत चर्चा करताना अजित पवार यांनी नवाब मलिक यांना चर्चेपासून दूर ठेवत, स्वतंत्र छोट्या गटामार्फत जागावाटपाच्या वाटाघाटी करता येतील, असा पर्याय सूचवला असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात येते. या भूमिकेमुळे मुंबईतील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याच बैठकीत माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या खात्याबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे. पुढे हे महत्त्वाचे खाते कुणाकडे द्यावे, यावर प्राथमिक पातळीवर विचारविनिमय झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
