नाशिक : भाजपच्या तिकीट वाटपावरून निर्माण झालेल्या वाद आणि गोंधळाची चौकशी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण करणार असून, दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी स्पष्ट भूमिका जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मांडली.
advertisement
गंभीर दखल घेतली जाणार
महाजन म्हणाले की, तिकीट वाटपाच्या वेळी झालेल्या गोंधळाच्या ठिकाणी मी प्रत्यक्ष उपस्थित नव्हतो. मात्र या प्रकरणाची गंभीर दखल वरिष्ठ स्तरावरून घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष स्वतः या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहेत. चौकशीनंतर दोषी आढळणाऱ्यांवर कोणतीही तडजोड न करता कारवाई केली जाईल. या संदर्भातील सविस्तर अहवाल प्रदेश पातळीवर पाठवला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नाशिकमधील गोंधळ आणि शिरसाठ–बिरारी प्रकरणावर प्रतिक्रिया देताना महाजन म्हणाले की, माघारीनंतर असा प्रकार घडेल, अशी अपेक्षा नव्हती. मात्र उमेदवारी वाटपाच्या प्रक्रियेत सर्वच पक्षांमध्ये काही प्रमाणात नाराजी आणि वाद निर्माण होतात. प्रत्येक निवडणुकीत उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या मोठी असते आणि सर्वांनाच तिकीट देणे शक्य नसते. त्यामुळे काही प्रमाणात नाराजी होणे स्वाभाविक आहे. अनेक ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षहितासाठी माघार घेतली आहे. ही नाराजी काही दिवसांत दूर होईल आणि नाशिकमध्ये भाजपचाच महापौर होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कोण सत्य? हे स्पष्ट होईल
शहाणे–बडगुजर प्रकरणावर बोलताना महाजन म्हणाले की, शेवटच्या क्षणी झालेल्या गोंधळामुळे कार्यकर्त्यांवर अन्याय झाला. काही लोकांनी मुद्दामहून परिस्थिती बिघडवली. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले असून सत्य लवकरच समोर येईल. बडगुजर आणि शहाणे यांच्यात नेमके कोण सत्य बोलत आहे, हे चौकशीतून स्पष्ट होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
