मुंबई भाजप अध्यक्षपदी आमदार अमित साटम यांची नियुक्ती करण्यात आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नेतृत्वाबाबत दृढ विश्वास व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, “अमित साटम यांच्या नेतृत्वाखालील भाजपा मुंबई महापालिकेत महायुतीची सत्ता नक्कीच आणेल. सलग तीन टर्म आमदार म्हणून त्यांनी केलेले काम आणि विधानसभेत अभ्यासू तसेच आक्रमक आमदार म्हणून त्यांनी निर्माण केलेली प्रतिमा ही त्यांच्या नेतृत्वाची मोठी ताकद आहे.”
advertisement
गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई भाजप अध्यक्षपदाची जबाबदारी आशिष शेलार यांनी समर्थपणे सांभाळली. त्यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेत मुंबई भाजपला चांगले यश मिळाले. त्यानंतर मध्यंतरी काही काळ मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई अध्यक्षपदाचा कार्यभार पाहिला होता. सध्या आशिष शेलार मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळत असल्याने मुंबई भाजप अध्यक्षपदासाठी नवे नेतृत्व देण्याची गरज निर्माण झाली.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजप अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी कोअर कमिटी आणि वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करून अमित साटम यांच्या नावावर अंतिम निर्णय घेतला. सलग तीन टर्म आमदार म्हणून अमित साटम यांनी आपल्या प्रामाणिक आणि आक्रमक कामामुळे कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण केला आहे. ते एक अभ्यासू आणि तळमळीचे आमदार म्हणून ओळखले जातात, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढे सांगितले की, “अमित साटम यांच्या नेतृत्वात मुंबई भाजप संघटनेत नवचैतन्य येईल. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीची सत्ता प्रस्थापित होईल. संघटनेच्या जबाबदारीत ते नक्कीच यशस्वी ठरतील. येत्या काळात त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबई भाजप एक नवा विक्रम प्रस्थापित करेल,” असा मला पूर्ण विश्वास आहे.येणाऱ्या पालिका निवडणुकीत भाजपा ताकदीने लढेन आणि नक्की विजय संपादन करेल यात शंका नाही.
मुंबई महापालिकेवर महायुतीची सत्ता आणण्यासाठी भाजप सज्ज असून नव्या नेतृत्वाखालील संघटना अधिक ताकदीने काम करेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांतूनही व्यक्त होत आहे. अमित साटम यांच्या कार्यकुशलतेचा आणि आक्रमक शैलीचा फायदा संघटनेला होईल, असे मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केले.