माजी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट पत्र लिहून प्रस्तावित ‘शक्तीपीठ महामार्गाला’ समर्थन जाहीर केले आहे. या भूमिकेमुळे काँग्रेसच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. नितीन राऊत हे काँग्रेसचे दिग्गज नेते असून त्यांची विदर्भातील राजकारणावर चांगलीच पकड आहे. काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक आहेत. नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून ते चार वेळा निवडून आले आहेत.
advertisement
नितीन राऊत यांनी आपल्या पत्रात विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी दिल्ली–नागपूर, हैदराबाद कॉरिडॉर, नागपूर–मुंबई समृद्धी महामार्ग आणि शक्तीपीठ विदर्भ–गोवा महामार्ग यांचे एकत्रीकरण करून सुवर्ण त्रिकोण उभारण्याची मागणी केली आहे. या महामार्ग त्रिकोणामुळे विदर्भाला देशाचे लॉजिस्टिक हब बनण्याची संधी मिळेल, असा दावा त्यांनी केला आहे.
याउलट, काँग्रेसमधील इतर नेते शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध करत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सुपीक जमीन अधिग्रहित होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल, या भीतीवर काँग्रेसचे नेते सातत्याने आवाज उठवत आहेत. मात्र राऊत यांनी त्याच प्रकल्पाला दुजोरा दिल्याने काँग्रेसच्या भूमिकेत स्पष्ट मतभेद उघडकीस आले आहेत.
राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे की, राऊत यांचे हे पत्र फडणवीसांसाठी दिलासा देणारे असून, ‘शक्तीपीठ महामार्गा’ला चालना मिळू शकते. विदर्भात आधीच विकास प्रकल्पांवरून काँग्रेसचे स्थानिक नेते भाजपविरोधात भूमिका घेत आहेत. अशावेळी राऊत यांचे समर्थन हे फक्त पायाभूत सुविधांवरील विचार नसून राजकीय संदेशही आहे, अशी चर्चा रंगली आहे.
राऊत यांनी केंद्र सरकारला देखील आवाहन केले आहे की, ‘शक्तीपीठ महामार्गाला राष्ट्रीय महत्त्वाचा प्रकल्प म्हणून दर्जा द्यावा.’ त्यामुळे हा प्रकल्प केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाचा ठरेल, असे त्यांनी नमूद केले आहे.
शेतकऱ्यांच्या नुकसानाच्या भीतीवरून विरोध केलेल्या प्रकल्पाला राऊत यांनी उघडपणे पाठिंबा का दिला? असा सवाल आता काँग्रेसमध्ये विचारला जात आहे. पक्षातील या फाटाफुटीमुळे विदर्भात काँग्रेसच्या संघटनात्मक एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.