नेमकी घटना काय?
रानोजी ऐनलेवाड हा मूळचा परोटी (ता. किनवट) येथील रहिवासी असून तो नांदेड येथे बीएस्सीच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. शिक्षणासाठी तो शहरात राहत असला तरी, घरची ओढ त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. आत्महत्येपूर्वी रानोजीने आपल्या भावाला आपल्याला शिक्षणासाठी नांदेडला जायचे असल्याचे सांगितले. भावानेही त्याला बुधवारी दुपारी इस्लापूर फाट्यापर्यंत सोडले. मात्र, रानोजी नांदेडला न जाता तिथून पुन्हा सहस्त्रकुंड परिसरात परतला आणि त्याने टोकाचे पाऊल उचलले.
advertisement
सोशल मीडियावरील ती शेवटची पोस्ट
रानोजीचे आई-वडील हे कामानिमित्त तेलंगणा राज्यात गेले होते. घरी आई-वडील नसल्याने रानोजीला एकाकी वाटत होतं. आत्महत्येपूर्वी त्याने सोशल मीडियावर आपल्या आई-वडिलांसाठी एक पोस्ट लिहिली होती. त्यात त्याने म्हटले होते, "आई-बाबा आज तुमची खूप आठवण येत आहे, लवकर या." ही पोस्ट पाहिल्यानंतर काही वेळातच त्याने सहस्त्रकुंड येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं. ३१ डिसेंबरच्या दुपारी त्याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. आई वडिलांच्या आठवणीत तरुणाने अशाप्रकारे आयुष्याचा शेवट केल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली असून अधिक तपास सुरू आहे.
