सोहम कृष्णा चिंदरकर (वय २२, रा. कलमठ, कुंभारवाडी) आणि ईश्वरी दीपक राणे (१८, रा. कणकवली, बांधकरवाडी) असं मृत आढळलेल्या कॉलेज युवक आणि युवतीची नावं आहेत. दोघांचा अशाप्रकारे शेवट झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकलं नाही. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सोहम चिंदरकर हा कणकवली येथील एका कॉलेजमध्ये कॉमर्सच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता. तर ईश्वरी ही एका खासगी कॉलेजमध्ये बारावीत शिक्षण घेत होती. सोहम आणि ईश्वरी हे एकमेकांना चांगले ओळखत होते. मंगळवारी सकाळी ८ वाजता नेहमीप्रमाणे सोहम कॉलेजला गेला होता. दुपारी एक वाजता तो परत आला. कॉलेजमधून आल्यानंतर त्याने आईला आपला मोबाईल हरवल्याचं सांगितलं. त्यानंतर सायंकाळी सात वाजता तो मोबाईल शोधण्यासाठी आपले काका मिलिंद चिंदरकर यांची मोटरसायकल घेवून घरातून बाहेर गेला आणि परतलाच नाही.
advertisement
मात्र तो रात्री उशिरापर्यंत परत न आल्याने कुटुंबीयांनी धरणाच्या सांडव्याजवळ त्याचा शोध घेतला. यावेळी सोहम आणि एक मुलगी पाण्यात बुडाल्याचे दिसून आलं. याची माहिती ईश्वरीच्या कुटुंबीयांना मिळताच त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. दोघांचेही मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आले आहेत. बुडताना त्यांच्या पायात चप्पल देखील होती. तसेच धरण स्थळावर मोटरसायकल आणि एक दोरी देखील आढळून आली. त्यामुळे त्यांनी एकाच वेळी आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. त्यांनी प्रेम प्रकरणातून हे टोकाचं पाऊल उचललं असावं, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
