महाराष्ट्र काँग्रेसने मुंबई महानगर पालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी स्वत: केली आहे. त्यामुळे आता मुंबईत काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचं जवळपास निश्चित समजलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज मुंबईत काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेसाठी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते आणि पदाधिकारी या कार्यशाळेला उपस्थित होती. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना रमेश चेन्निथला यांनी स्वबळाचा नारा दिला.
advertisement
विशेष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी मनसेला सोबत घेऊन लढवेल, अशी चर्चा सुरू होता. ठाकरे बंधू एकत्र आल्याने मुंबईसह राज्यात महाविकास आघाडीची ताकद वाढेल, असं बोललं जात होतं. मात्र मनसेला सोबत घेण्यास सुरुवातीपासून काँग्रेसचा विरोध होता. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि नेते विजय वडेट्टीवार यांनी यापूर्वीच मनसेला सोबत घेण्यास विरोध केला आहे. मुंबई काँग्रेसने देखील मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवावी, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली होती. आता स्थानिक कार्यकर्त्यांची भूमिका लक्षात घेऊन काँग्रेसने मुंबईत स्वबळाचा नारा दिल्याचं सांगितलं जात आहे. आता यावर मनसे आणि ठाकरे गटाकडून काय भूमिका घेतली जाणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
