ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांना वेग आला असताना मविआमधील प्रवेशाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. महाविकास आघाडीसोबतच्या मतदारयादी घोळाविरुद्धच्या आंदोलनात, बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहभागी झाले होते. त्यामुळे मनसेदेखील आता महाविकास आघाडीत येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत निर्णय काय?
महाराष्ट्र काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या टिळक भवन येथे झालेल्या महत्त्वाच्या नेत्यांच्या महत्त्वाच्या बैठकीत मनसेसोबत कोणत्याही परिस्थितीत युती न करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीत काँग्रेसचे अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. स्थानिक संस्थांच्या निवडणुकांसाठी काँग्रेसने सहयोगी पक्षांसोबत युती करण्यास हरकत नसल्याचे सांगितले, मात्र ही युती केवळ INDIA आघाडीत असलेल्या पक्षांसोबतच असेल, असे नेत्यांनी स्पष्ट केले.
advertisement
स्थानिक पातळीवरही युती, पण...
काँग्रेस नेत्यांनी मत व्यक्त केले की, मनसेचा INDIA आघाडीत समावेश नसल्याने त्यांच्यासोबत जाणे आघाडीच्या तत्त्वांना आणि विचारसरणीला विरोधी ठरेल. त्यामुळे मनसेसोबत युतीचा प्रस्ताव पूर्णपणे फेटाळण्यात आला.
स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी काँग्रेस युतीला तयार आहे. मात्र, युती फक्त INDIA आघाडीतील पक्षांसोबत होणार असल्याचे काँग्रेसने म्हटले. मनसेसोबत कोणत्याही पातळीवर चर्चा अथवा युती होणार नसल्याचेही काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट केले. राज्यातील नेत्यांनी घेतलेला हा निर्णय आता दिल्लीत हायकमांडकडे पाठवण्यात येणार आहे.
