मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने जाहीर केलेल्या १३९ प्रभागांच्या उमेदवार यादीत अल्पसंख्यांक समाजाला ठळक प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. या यादीत तब्बल ३१ उमेदवार अल्पसंख्यांक समाजातून देण्यात आले असून, काँग्रेसच्या पारंपरिक मतदारवर्गावर पुन्हा पकड मजबूत करण्याचा हा प्रयत्न मानला जात आहे.
मराठी-अमराठी मतांचीही मोट बांधण्याचा प्रयत्न...
अल्पसंख्यांक मतदार ही काँग्रेसची हक्काची आणि पारंपरिक वोटबँक मानली जाते. त्यामुळे त्यांना पुन्हा आकर्षित करण्यावर पक्ष नेतृत्वाने विशेष भर दिल्याचे उमेदवारी यादीतून स्पष्ट होते. मात्र याचवेळी काँग्रेसने केवळ एका घटकापुरती मर्यादा न ठेवता, अमराठी समाजातील मतदारांनाही आकर्षित करण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र आहे. त्यानुसार मराठी आणि अमराठी अशा दोन्ही पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.
advertisement
विशेष म्हणजे यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचे घटक पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असल्याने काँग्रेस एकटीच्या बळावर मैदानात उतरली आहे. या पार्श्वभूमीवर आघाडीतील इतर पक्षांचे पारंपरिक मतदारही आपल्याकडे वळावेत, या दृष्टीने उमेदवार निवडीत सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
काँग्रेसच्या या रणनीतीमुळे अल्पसंख्यांकांसह अमराठी मतदारांमध्ये पक्षाला कितपत यश मिळते, हे आगामी निकालातून स्पष्ट होणार आहे. मात्र उमेदवार यादीवरून काँग्रेसने ‘समावेशक राजकारण’ आणि व्यापक मतदारसंघ बांधणीचा संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचे निश्चित मानले जात आहे.
