मुंबईत महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्ष एकत्र लढणार का याकडे सगळ्यांचे लक्ष होते. विशेष म्हणजे राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेल्याने महायुतीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. याच पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षासोबत जायला नको, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. काँग्रेसच्या भूमिकेवर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असताना प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी लगोलग भूमिका स्पष्ट केली.
advertisement
'एकला चलो रे' अशी भूमिका घेऊन महाराष्ट्र भर आमची मोर्चे बांधणी
मुंबईत नुकतीच आमची एक बैठक झाली होती. त्या बैठकीत युतीत न लढण्याचा अनेकांचा सूर होता. असे असले तरी निवडणुका जाहीर होणे बाकी आहे. निवडणूक जाहीर होण्याअगोदर काँग्रेस आपली भूमिका स्पष्ट करेल. सध्या तरी 'एकला चलो रे' अशी भूमिका घेऊन महाराष्ट्र भर आमची मोर्चे बांधणी सुरू आहे, असे सपकाळ म्हणाले.
पक्षाने स्वबळावर लढावे हीच आमची भूमिका- भाई जगताप
भाई जगताप म्हणाले, मी जेव्हा मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष होतो तेव्हा माझी भूमिका हीच होती आणि आताही आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्षाने स्वबळावर लढाव्यात. कारण या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात. त्यांना या निवडणुकांत संधी मिळते. त्यांचे नेतृत्व घडत असते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाने स्वबळावरच लढाव्यात.
आमची एक बैठक झाली. या बैठकीला प्रभारी रमेश चेन्निथला उपस्थित होते. पक्षाने स्वबळावर लढावे अशी भूमिका मी त्यावेळी मांडली. अनेक लोकांनी अशाच प्रकारचे मत मांडले. अध्यक्ष असताना मांडलेली भूमिका आणि आत्ताची भूमिका यात कोणताही बदल झालेला नाही, असे जगताप म्हणाले.
