नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्ष प्रचारात दंगून गेले आहेत. निवडणूक काळात आदर्श आचारसंहिता असल्याने शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी नियमावली आखून देण्यात आली आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचा भंग विद्याधर महाले यांनी केला असून त्यांच्याविरोधात कारवाई करावी, अशी मागणी बोंद्रे यांनी केली आहे.
भाजपला मतदान करण्याचे थेट आवाहन
advertisement
काही दिवसांपूर्वी चिखली येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमात त्यांनी शासकीय कर्मचारी असूनही राजकीय स्टेजवर उपस्थिती लावली. राजकीय कार्यक्रमाच्या पोस्टरवर त्यांचे फोटो झळकले, तसेच तेथून थेट भाजपला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.
आचारसंहितेचा स्पष्ट भंग, लोकशाही मूल्यांवरील आक्रमण
याहून महत्त्वाचे म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांना कोणताही राजकीय हस्तक्षेप करणे कायद्याने पूर्णपणे प्रतिबंधित आहे. शासकीय कर्मचारी हे जनतेची सेवा करण्यासाठी असतात, कोणत्याही पक्षाचा प्रचार करण्यासाठी नाहीत. अशा प्रकारे पदाचा, शासकीय कार्यालयाचा आणि अधिकाऱ्यांच्या प्रतिष्ठेचा वापर राजकीय फायद्यासाठी करणे हा निवडणूक आचारसंहितेचा स्पष्ट भंग आणि लोकशाही मूल्यांवरील आक्रमण आहे. विशेषतः विद्याधर महाले हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव या जबाबदारीच्या पदावर कार्यरत असल्याने, त्यांच्याकडून असा राजकीय हस्तक्षेप होणे अत्यंत अनुचित व चिंताजनक असल्याचे राहुल बोंद्रे म्हणाले.
