पैठण: छत्रपती संभाजीनगरमधून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. पैठण महामार्गावर भरधाव कंटेनरने दुचाकीस्वाराला भीषण धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागेवरच मृत्यू झाला. भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिल्यानंतर काही अंतर फरफटत नेलं होतं, त्यामुळे रस्त्यावर रक्त आणि मांसाचे तुकडे चिटकले होते, हे दृश्य पाहून स्थानिकांनी हळहळ व्यक्त केली.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ईसरवाडी फाटा–पैठण महामार्गावर दुपाराच्या सुमारास ही भीषण घटना घडली. कृष्णा मस्के असं मृत तरुणाचं नाव आहे. कृष्णा आणि त्याच्यासोबत त्याचा मित्र दोघे जण दुचाकीवरून पैठण महामार्गावरून जात होते. ईसरवाडी फाट्याजवळ मुक्तेश्वर शुग कारखान्याजवळ पोहोचले असता भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिली.
रस्त्यावर मांसाचे तुकडे
धडक बसल्यानंतर दुचाकीसह दोघेही जण खाली पडले आणि कंटेनरच्या चाकाखाली सापडले. कंटेनर चालकाने गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण दुचाकीसह कृष्णाला काही अंतर फरफटत नेलं. या अपघातात कृष्णा मस्केचा जागेवरच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेल्या तरुण गंभीर जखमी झाला. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातानंतर दुचाकीचा चुराडा झाला. रस्त्यावर रक्त आणि मांसाचे तुकडे पडलेले होते. स्थानिकांनी धाव घेऊन मृतदेहावर चादर टाकली.
जखमीला तातडीने रुग्णालयात हलवलं
या अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमीला तात्काळ छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. कंटेनरचालकाला ताब्यात घेण्यात आलं असून अधिक तपास पोलीस करत आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
