ही घटना नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार गावात घडली. इथं एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. दोन भावांनी रेल्वे समोर उडी मारून आत्महत्या केली. तर त्यांच्या आई-वडिलांचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. आई-वडिलांनी आत्महत्या केली की घातपात झाला? याचा तपास सुरू आहे.
चौघांच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून आर्थिक विवंचनेतून हा प्रकार घडला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर जवळा मुरार गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकारी गावात दाखल झाले आहेत.
advertisement
बजरंग रमेश लखे (वय २२) उमेश रमेश लखे ( वय २५), वडील रमेश होनाजी लखे (वय ५१), आई राधाबाई रमेश लखे (वय ४४) असं मृत आढळलेल्या चौघांची नावं आहेत. बजरंग आणि उमेश या दोन सख्ख्या भावांचा मुगट रेल्वे स्थानक परिसरात मृतदेह आढळला. तर वडील रमेश आणि आई राधाबाई लखे यांचा मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. लखे कुटुंबात हे चारच लोक होते. या घटनेनं संपूर्ण कुटुंब संपलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उमेश लखे हा मनसेचा मुदखेडचा माजी तालुका उपाध्यक्ष असल्याची माहिती आहे. सामाजिक कार्यातही उमेशचा सक्रिय सहभाग होता. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
